- *कोळगाव ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर सांडपाणी सोडण्याचा प्रकार*
*सरपंचांची तीव्र नाराजी; दोषींवर कारवाईचा इशारा*
Oplus_16908288 
Oplus_16908288
पालघर:-दि २:-कोळगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही भाडेकरूंकडून घरगुती सांडपाणी थेट सार्वजनिक रस्त्यावर सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोषी मालकांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता, काही भाडेकरूंनी कोणतीही सोय न करता सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार स्वच्छता नियमांना विरोधात असून, ग्रामपंचायत अधिनियम व स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांना हरताळ फासणारा असल्याचे सरपंचांनी सांगितले.
“ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक रस्ते, नाले व जागा स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सांडपाणी रस्त्यावर सोडणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. संबंधित भाडेकरू व घरमालकांना नोटिसा बजावण्यात येतील. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल,” असा इशारा सरपंचांनी दिला.
ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे, तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
कोट -भाडेकरू व घर मालकाला नोटीस बजाणुन नियमाचे उल्लघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
सरपंच -कुणाल पाटील

