मूल्याधिष्ठित नेतृत्वातूनच शाश्वत भविष्य घडते : बीके शिवानी बहन

पालघर : विराज प्रोफाइल्स प्रा. लि. यांच्या वतीने ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रसिद्ध प्रेरणादायी वक्त्या बीके शिवानी बहन यांचे “शाश्वत भविष्यासाठी मूल्याधिष्ठित नेतृत्व” या विषयावरील विशेष नेतृत्व सत्राचे आयोजन सोमवारी (३ ऑगस्ट) करण्यात आले. या कार्यक्रमास उद्योग क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यावेळी बीके शिवानी बहन यांनी आजच्या वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक आणि तांत्रिक युगात नेतृत्वासाठी केवळ कौशल्य किंवा योग्य निर्णय पुरेसे नसून प्रामाणिकपणा, विश्वास, आत्मजाणीव आणि जबाबदारी या मूल्यांवर आधारित नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. मूल्याधिष्ठित नेतृत्वामुळे संस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होते, कार्यसंस्कृती अधिक सक्षम बनते आणि दीर्घकालीन शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा होतो, असे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वेगवान नवकल्पना आणि बदलत्या व्यावसायिक अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर संस्थांनी उद्देशपूर्ण आणि मूल्याधिष्ठित कार्यपद्धती स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्यक्ती, संस्था आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नैतिक मूल्यांचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचा संदेशही त्यांनी दिला.
विराज प्रोफाइल्स प्रा. लि.च्या वतीने सांगण्यात आले की, संस्थेचा दीर्घकालीन यशावर विश्वास असून त्याचा पाया मजबूत मूल्ये, जबाबदार नेतृत्व आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीवर आधारित आहे. या सत्राच्या माध्यमातून नेतृत्व, विश्वास आणि शाश्वत विकास या विषयांवर अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थितांनी बीके शिवानी बहन यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मूल्याधिष्ठित नेतृत्वाच्या माध्यमातून भविष्यात अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि शाश्वत संस्था उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
Views: 6

