खवडा वीज वहन प्रकल्पात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४.५ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई

पालघर, वार्ताहर
रेझोनिया लिमिटेडद्वारे संचालित खवडा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडने खवडा वीज वहन प्रकल्पाअंतर्गत स्थानिक समुदायांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत आतापर्यंत ४.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई वितरित केली आहे. ही भरपाई डिमांड ड्राफ्टद्वारे पालघर जिल्ह्यातील जव्हार, विक्रमगड, वाडा व ठाणे जिल्ह्यातील भिवंडी या चार तालुक्यांतील शेतकरी व जमीनधारकांना अदा करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी अधिकृत दर जाहीर केल्यानंतर टॉवर नुकसानभरपाईची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. त्यानुसार विक्रमगड येथे प्रति चौ. मी. ६२७ रुपये, वाडा १,२५३ रुपये, जव्हार २४४ रुपये आणि भिवंडी येथे ३,३०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. वाडा तालुक्यातील पंढरीनाथ पाटील यांना १३.९८ लाख तर महेंद्र जाधव यांना ८.८९ लाख रुपये देण्यात आले असून, काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना तेवढीच अतिरिक्त भरपाई मिळणार आहे. आजपर्यंत २.१२ कोटी रुपये पिके व झाडांसाठी, तर २.५२ कोटी रुपये जमीन नुकसानभरपाई म्हणून वितरित करण्यात आले आहेत. टॉवर उभारणीदरम्यान पिकांचे नुकसान झाल्यास प्रत्यक्ष क्षेत्रफळ व पिकाच्या प्रकारानुसार भरपाई दिली जात आहे. झाडांसाठी महसूल, उद्यानविद्या व वन विभागांच्या संयुक्त पाहणीनंतर शासननियमांनुसार मूल्यांकन करून रक्कम अदा करण्यात येते.
तालुकास्तरावर एकसमान व पारदर्शक धोरण तयार करून देशातील आकर्षक दरांपैकी एक महाराष्ट्रात लागू करण्यात आला असून, क्षेत्रीय पथकांकडून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत दिली जात आहे. यामुळे प्रकल्पकाळात शेतकरी व जमीनधारकांवरील आर्थिक भार कमी होत आहे.

