*ग्लोबल कोकण महोत्सवात ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ उत्साहात संपन्न*
![]()
![]()
पालघर, दि. १८ (जिमाका): कोकण किनाऱ्यावरील निसर्गरम्य शिरगाव बीच येथे सुरू असलेल्या ग्लोबल कोकण महोत्सव 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
राज्याच्या औद्योगिक व निर्यात क्षमतेला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमात प्रशासन, उद्योग क्षेत्र आणि नवउद्योजकांचा प्रभावी सहभाग दिसून आला.
विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, डहाणू उपविभागीय अधिकारी विशाल खत्री तसेच कोकण विभागाच्या सहसंचालक (उद्योग) विजू सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
“नोकरी घेणारे नव्हे, नोकरी देणारे व्हा”
अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आगामी काळात विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार असून किनारी, डोंगरी आणि नागरी भागात औद्योगिक संधी वाढणार आहेत. युवकांनी या संधींचा लाभ घेत उद्योजकतेकडे वळावे आणि “नोकरी देणारे” बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांनी प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट करत स्थानिक प्रशासनाशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. विशेषतः आदिवासी भागातील सुशिक्षित युवक-युवतींनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे, असे त्यांनी सांगितले.
पालघरची निर्यात ३०,१३८ कोटींवर
सहसंचालक (उद्योग) श्रीमती विजू सिरसाठ यांनी प्रास्ताविकात पालघर जिल्ह्याने मागील वर्षी तब्बल रु. ३०,१३८ कोटींची निर्यात साध्य केल्याची माहिती दिली. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) अंतर्गत चिकू व सागरी उत्पादनांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नवउद्योजकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासारख्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा, असे आवाहन त्यांनी केले.
निर्यात प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन
Directorate General of Foreign Trade (DGFT), मुंबई येथील विदेश व्यापार विकास अधिकारी प्रमोद थावरे यांनी निर्यातीसाठी आवश्यक परवाने व योजनांची माहिती दिली. तर Federation of Indian Export Organisations (FIEO) च्या वरिष्ठ कार्यकारी रिशु वर्मा यांनी निर्यात प्रोत्साहन परिषदांची भूमिका स्पष्ट केली.
The New India Assurance Company चे वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक अनिल जाधव यांनी विविध विमा संरक्षण योजनांची माहिती दिली. IDBI Capital चे सहाय्यक व्यवस्थापक उमेश रनोलिया यांनी अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उद्योजकांसाठी उपलब्ध अर्थसहाय्य योजनांवर प्रकाश टाकला.
कौशल्य विकास आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’
अभिनव इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक अफान हैदर यांनी ‘स्किल इंडिया’ अंतर्गत अप्रेंटिसशिप योजनेचे सादरीकरण केले. ‘मैत्री’चे नोडल अधिकारी. विजय शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारणा व ‘मैत्री कायदा’ यांची माहिती दिली. पर्यटन क्षेत्रातील होमस्टे, रिसॉर्ट व हॉटेल्ससाठी आवश्यक बांधकाम परवानग्यांबाबत वास्तुविशारद योगेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेअंती प्रश्नोत्तर सत्रात उद्योजकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध उद्योग योजनांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी धम्मपाल थोरात यांनी केले, तर व्यवस्थापक उद्धव माने यांनी आभार प्रदर्शन केले.
ODOP दालनांना विशेष आकर्षण
महोत्सवात चिकू उत्पादने (ODOP) तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांची दालने प्रदर्शित करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्र, रोटरी क्लब ऑफ विरार, एमसीईडी आणि मिटकॉन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वी ठरला.


