दांडेकर महाविद्यालयात महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रतिनिधी अनिल साळुंखे


दांडेकर महाविद्यालयात महिला सन्मान कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी अनिल साळुंखे

Oplus_16908288
Oplus_16908288

मनोर,11
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे शिक्षक व शिक्षकेतर महिला सहकाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील महिला आपल्या कर्तव्यनिष्ठा, परिश्रम व समर्पणाच्या भावनेने संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महिला सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की, समाजामध्ये कोणतीही गोष्ट अति टोकाला गेली की त्याची प्रतिक्रिया उमटते. पूर्वी समाजात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आणि त्या कनिष्ठ व प्रतिकूल अवस्थेत गेल्या होत्या; मात्र आजच्या काळात महिला शिक्षण, विज्ञान, प्रशासन, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत आघाडीवर आहेत. हीच त्या अन्यायाची सकारात्मक प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्त्री-पुरुष नात्यामध्ये समन्वय, परस्पर सन्मान व सहकार्याची भावना असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर महिला सहकाऱ्यांनी सुंदर कविता, गीते आणि कथा सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. प्रा. अनघा देशमुख, डॉ. दर्शन चौधरी, प्रा. पूनम गणात्रा, सौ. नंदिनी ठाकूर, सौ. मोनिका कुलकर्णी आणि सौ. उज्वला जाधव यांनी कविता, ओव्या आणि गीते सादर केली. डॉ. संगीता ठाकूर यांनी महिला संस्कृती टिकविणे, जोडणे व संवर्धन करणे या विषयावर स्वरचित कविता सादर केली. प्रा. मधुर राऊत यांनी इतिहासात स्त्रिया देखील पराक्रमी व लढवय्या होत्या, याविषयीचे संशोधन मांडले. प्रा. रेणू दुबे यांनी प्रकाशझोतात नसलेल्या महिलांचाही सन्मान झाला पाहिजे, या आशयाची प्रभावी कविता सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना मोगऱ्याच्या फुलांची रोपे भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. शीला गोडबोले पाईकराव यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या पदाधिकारी श्रीमती अमिताताई राऊत, सौ. हिमाणीताई राऊत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ तसेच महिला विकास कक्षाच्या सदस्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महिला विकास कक्षाच्या सर्व सदस्यांनी तसेच प्रा. आनंद जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी महिला विकास कक्षाचे सदस्य प्रा. विवेक कुडू यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील मोठ्या संख्येने महिला सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.

दरम्यान महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयातर्फेही जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी स्वलिखित तसेच स्वतःला भावलेली कविता वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजकल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण व स्त्री सक्षमीकरणासाठी केलेल्या महान कार्याची माहिती दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेसाठी डॉ. दर्शना चौधरी म्हात्रे या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या. स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध विषयांवरील कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी केले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!