नालासोपाऱ्यात सांडपाणी अडवून गवत शेती* *डासांचा प्रादुर्भाव वाढवणे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल!* *विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*


*नालासोपाऱ्यात सांडपाणी अडवून गवत शेती*

*डासांचा प्रादुर्भाव वाढवणे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल!*

*विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*

अनिरुद्ध मिश्रा /विरार : नालासोपारा पश्चिममेकडील शनी मंदिर म्हाडा रोड परिसरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नैसर्गिक नाल्याचा प्रवाह रोखून, तिथे सांडपाणी साठवून त्यावर गवत वाढवणाऱ्या आणि पर्यायाने परिसरात डेंग्यू-मलेरियासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण करणाऱ्या 6 जणांविरुद्ध अखेर नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गंभीर समस्या वसई-विरार महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रकर्षाने समोर आणली होती. त्यांनी या विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करतानाच महानगरपालिकेच्या महासभेतही हा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मनोज पाटील यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता, ज्याची परिणती आता प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यात झाली आहे.

महानगरपालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अविनाश गुंजाळकर आणि त्यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, काही इसम नाल्यामध्ये मातीचा भराव टाकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद करत होते. साचलेल्या या सांडपाण्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढवून, त्याची कापणी करून विक्री करण्याचा यामागील उद्देश होता. मात्र, या साठलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरून डासांची मोठी उत्पत्ती होत होती, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. प्रशासनाने यापूर्वी नोटीस देऊनही या कृत्यात सुधारणा न झाल्याने अखेर संदीप चव्हाण, प्रकाश एकांबी, सुरेश एकांबी, नागेश मणी, माणिक कोरी, सचिन मोरे आणि संजय सिंग या 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 च्या कलम 271, 272, 3(5) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 117 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि पाठपुराव्यामुळे अखेर आरोग्य विघातक कृत्य करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारला गेल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!