नावझे येथे ऍनिमल पास ब्रिजला डम्परची धडक चालक गंभीर जखमी पुलाचे नुकसा


नावझे येथे ऍनिमल पास ब्रिजला डम्परची धडक

चालक गंभीर जखमी पुलाचे नुकसा

– अनिल साळुंखे

मनोर,26/04/26
पालघर तालुक्यातील नावझे गावाच्या हद्दीत वन्य प्राण्यांच्या हालचालीसाठी उभारण्यात आलेल्या ऍनिमल पास ब्रिजला भरधाव डम्परने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या अपघातात डम्परचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच पुलाच्या लोखंडी गर्डरला धडक बसल्याने पुलाचेही नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाखालील या ऍनिमल पास ब्रिजखालून जात असताना डम्परने अचानक नियंत्रण गमावले आणि पुलाच्या संरचनेला जोरदार धडक दिली. या धडकेत डम्परचे मोठे नुकसान झाले, तर चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान दोन महिन्यांपूर्वी खामलोली गावाच्या हद्दीतही याच महामार्गावरील लोखंडी पादचारी पुलाला डम्परने धडक दिल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, येत्या काही महिन्यांत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. मात्र ठेकेदारांकडून नव्याने तयार झालेल्या रस्त्याचा बेकायदेशीररीत्या माती व मुरूम वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. नावझे व धुकटन परिसरात उभारण्यात येणाऱ्या रेस्ट एरियासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्याचे काम सुरू असून शेकडो अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.

या अवजड वाहतुकीदरम्यान नियमांचे उल्लंघन, ओव्हरलोड वाहतूक आणि निष्काळजीपणामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे नुकताच पूर्ण झालेला ऍनिमल पास ब्रिज वापरात येण्यापूर्वीच या धडकेत बाधित झाल्याने खळबळ उडाली आहे.

मासवण ते वसई तालुक्यातील कोपर फाटा या मार्गाच्या बांधकामाचा ठेका जीआर इन्फ्रा कंपनीकडे असून ठेकेदाराकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे कामगार व स्थानिक ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच महामार्गावर अवजड वाहनांच्या अनियमित वाहतुकीवर नियंत्रण आणावे. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!