- *‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ मोखाडा येथे २४ फेब्रुवारी रोजी*
पालघर, दि. २० फेब्रुवारी : तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना सक्षम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून राज्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल १००० रोजगार मेळावे/प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्याचाच भाग म्हणून पालघर जिल्ह्यात २० रोजगार मेळावे घेण्याचे उद्दिष्ट आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमास जिल्हा स्तरावर वेग आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकुर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी २०२६, मंगळवार रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत मोखाडा (जि. पालघर) येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात हा रोजगार मेळावा पार पडणार आहे. जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध नामांकित उद्योग-उद्योजकांकडील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी https://www.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करून ‘नोकरी साधक लॉगिन’मधून प्रवेश करावा. डॅशबोर्डवरील ‘पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायावर क्लिक करून ‘पालघर जिल्हा’ निवडावा व ‘प्लेसमेंट ड्राइव्ह (२०२५-२६) पालघर’ निवडून संबंधित नियोक्त्यांच्या रिक्त पदांची माहिती घ्यावी. आवश्यक पात्रता पूर्ण होत असल्याची खात्री करून पसंतीक्रम नोंदवणे अनिवार्य आहे.
प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहताना किमान पाच प्रतींमध्ये बायोडाटा, अलीकडील छायाचित्र, आधारकार्ड, सेवायोजना नोंदणी कार्ड तसेच शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेची कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले.
या उपक्रमाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या ०२५२५-२९९८१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रभारी सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता) रविंद्र सुरवसे यांनी कळविले आहे.

