पालघर लोकसभा कार्यालय
वांद्रे–उधना विशेष रेल्वे आता दररोज धावणार
-
- Oplus_16908288
खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्याला यश
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण, प्रभावी आणि पाठपुराव्याच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून ०९०५५–५६ वांद्रे–उधना विशेष रेल्वे सेवा आता दैनिक (दररोज) स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी ही रेल्वे आठवड्यातून केवळ पाच दिवस धावत असल्यामुळे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. विशेषतः बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वाणगाव, केळवे रोड, उमरोली, सफाळे व वैतरणा या स्थानकांवरील कर्मचारी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितता व प्रवासाच्या दृष्टीने मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन मा. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी १३ जानेवारी २०२५ पासून सातत्याने रेल्वे प्रशासन व माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच हा विषय संसदेत प्रभावीपणे मांडण्यात आला. दिनांक २१.०१.२०२६ रोजी DRM मुंबई यांच्याकडेही हा प्रश्न ठोसपणे मांडण्यात आला होता.
या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आता गुरुवार व शुक्रवार या दिवसांसाठी नवीन विशेष रेल्वे गाड्या घोषित करण्यात आल्या असून त्यामुळे वांद्रे–उधना मार्गावरील रेल्वे सेवा प्रत्यक्षात दैनिक झाली आहे.
विद्यमान रेल्वे सेवा:
• ०९०५५ – वांद्रे ते उधना (रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार)
• ०९०५६ – उधना ते वांद्रे (शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार)
नवीन घोषित रेल्वे सेवा:
• ०९०३५ – वांद्रे ते उधना (शुक्रवार, शनिवार)
• ०९०३६ – उधना ते वांद्रे (गुरुवार, शुक्रवार)
या नव्या गाड्यांमुळे विरार ते वलसाड दरम्यान प्रवास करणाऱ्या असंख्य कर्मचारी, कामगार, व्यापारी व विद्यार्थी वर्गामध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याचबरोबर, सुट्टी विशेष तसेच नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना पालघर जिल्ह्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणीही खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री व पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वांद्रे–भिवाणी सुट्टी विशेष रेल्वे गाडीला पालघर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे.
तसेच डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा अधिक सक्षम व विस्तारित करण्यासाठी खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे प्रयत्न सातत्याने सुरू असून भविष्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

