पेसा भरती प्रक्रिया शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून ८१९ शिक्षण सेवकांना नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे


 

पेसा भरती प्रक्रिया शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून ८१९ शिक्षण सेवकांना नियुक्ती – मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे

Oplus_16908288

पेसा क्षेत्रासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शिक्षण सेवक पदाच्या ८१९ रिक्त पदांची भरती प्रक्रिया कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील,शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनाली मातेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे पेसा क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी मिळणार असून स्थानिक अनुसूचित जमातीतील पात्र उमेदवारांना न्याय मिळाला आहे.
पेसा क्षेत्रातील भरती संदर्भात सन २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाले होते. त्यानंतर दि. ५ ऑक्टोबर २०२४ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार संबंधित उमेदवारांना मानधन तत्वावर कार्यरत ठेवण्यात आले होते. पुढे दि. ११ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार तसेच मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या पत्रानुसार या उमेदवारांना शिक्षण सेवक पदावर नियमित नियुक्ती देण्यात आली.
या भरती प्रक्रियेत रिक्त पदांच्या मर्यादेत एकूण ८१९ पदे भरण्यात आली. पेसा क्षेत्रातील ग्रामनिहाय अनुसूचित जमाती लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्यात आली आहे. ज्या गावांमध्ये अनुसूचित जमाती लोकसंख्या ०.२५ (२५ टक्क्यांपर्यंत) आहे, तेथे २५ टक्के पदे; २५ ते ५० टक्के लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ५० टक्के पदे; तसेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये रिक्त पदांच्या ५० टक्के पदे भरण्यात आली आहेत.
याचबरोबर मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या १६ ग्रामसेवकांनाही नियुक्ती आदेश देण्यात आले असून, पेसा क्षेत्रात त्यांची कंत्राटी स्वरूपात नियमित नियुक्ती करण्यात आली आहे.
“रिक्त पदांच्या ५० टक्के मर्यादेतच सर्व ८१९ उमेदवारांना सामावून घेण्यात आले असून, शासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्वांना न्याय मिळेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर सर्व उमेदवारांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!