वन महोत्सवानिमित्त पालघर जिल्ह्यात वडाच्या वृक्षारोपणाने शुभारंभ; बांबू उत्पादक शेतकऱ्यांना रोपे व अनुदान वितरण


  1. वन महोत्सवानिमित्त पालघर जिल्ह्यात वडाच्या वृक्षारोपणाने शुभारंभ; बांबू उत्पादक शेतकऱ्यांना रोपे व अनुदान वितरण

दि. १७ : महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे मा. ना. श्री. गणेश नाईक, मंत्री (वने), महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा यांच्या शुभहस्ते वडाच्या पवित्र वृक्षाचे लागवड करून वन महोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, हरित महाराष्ट्र आणि शाश्वत विकासाचा संदेश देणाऱ्या या वृक्षारोपणातून कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात झाली.

यानंतर महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर आयोजित “शेतकऱ्यांना बांबू रोपांचे वाटप व अनुदान वितरण कार्यक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास पालघर जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. नामदार श्री. गणेश नाईक होते. अध्यक्षांचे स्वागत ऋषिकेश रंजन व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपुर यांनी केल्यानंतर इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी मा. खासदार डॉ. हेमंत सवरा, विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे, श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री. रविंद्र फाटक, विधानसभा सदस्य श्री. राजेंद्र गावीत, श्री. शांताराम मोरे, श्री. विलास तरे, श्री. विनोद निकोले, श्री. हरिश्चंद्र भोये, सौ. स्नेहा दुबे पंडित, श्री. राजन नाईक, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त श्री. पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज रानडे, अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी श्रीमती अपूर्वा वासूर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. राजू होकणे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमा वेळी श्री ऋषिकेश रंजन यांनी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.पालघर जिल्ह्यात सुमारे 4 हजार शेतकरी या योजनेत सहभागी असून सुमारे 16 हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे पालघर हा महाराष्ट्रातील आघाडीचा बांबू लागवड जिल्हा ठरला आहे. मंडळामार्फत बांबू लागवडीबरोबरच बांबू आधारित उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगारनिर्मितीवर भर दिला जात आहे. 2026 पर्यंत 1लाख एकर आणि 2029 पर्यंत 3 लाख एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय बांबू अभियान व अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील प्रतिनिधिक स्वरूपातील 31 बांबू उत्पादक शेतकऱ्यांना बांबू रोपे व अनुदान मंजुरीपत्रांचे वितरण मा. मंत्री महोदयांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डहाणू वन विभागाने प्रकाशित केलेल्या “बांबूपासून समृद्धीकडे” या बांबू मार्गदर्शक पुस्तकाचेही मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनात मा. मंत्री श्री. गणेश नाईक यांनी बांबू हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचे प्रभावी पीक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच बांबू लागवडीकडे वळल्यास उत्पन्नात वाढ होऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, पालघर जिल्हा हा आघाडीचा बांबू उत्पादक जिल्हा असून भविष्यात निश्चितपणाने क्रमांक एक वर येणार आहे,बांबू लागवडीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे, तसेच बांबू आधारित उद्योगांना चालना देऊन ग्रामीण विकासाला गती द्यावी,असे त्यांनी नमूद केले. तसेच वन महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारून पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान वन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरण संवर्धन उपक्रमांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे अधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री निरंजन दिवाकर उपवनसंरक्षक प्रादेशिक डहाणू यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!