स्वप्नांच्या पंखांना मिळाली यशाची झेप; प्रा. मिल्का तुस्कानो यांना पीएच.डी. पदवी प्राप्त! अभ्यास, कर्तव्य आणि जिद्दीचा संगम; प्रा. तुस्कानो यांची शैक्षणिक झेप


स्वप्नांच्या पंखांना मिळाली यशाची झेप; प्रा. मिल्का तुस्कानो यांना पीएच.डी. पदवी प्राप्त!

अभ्यास, कर्तव्य आणि जिद्दीचा संगम; प्रा. तुस्कानो यांची शैक्षणिक झेप

Oplus_16908288

पालघर प्रतिनिधी : मिलिंद चुरी

पालघर :सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळाच्या विधी महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा. मिल्का तुस्कानो यांनी राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद २१ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी केलेल्या सखोल संशोधनामुळे त्यांच्या कार्याची शैक्षणिक तसेच सामाजिक पातळीवर दखल घेतली जात आहे.

“भारतीय राज्यघटनेतील कलम २१ च्या विशेष संदर्भात राज्यशास्त्र आणि कायदा यांचा परस्परसंबंध” हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता. या संशोधनातून जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित मूलभूत हक्कांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले असून राज्यशास्त्र व कायदा यांच्यातील सूक्ष्म नाते त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहे.

प्रा. तुस्कानो यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर एलएलबी व एलएलएम पदव्या संपादन केल्या आहेत. या भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्या संशोधन कार्याला अधिक बळ मिळाले आहे.

या संशोधनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या व सह-मार्गदर्शक डॉ. पायल चोलेरा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांचे पती फ्रेझर, सासू-सासरे, आई-वडील, डॉ. समता पाटील, प्रा. मिनेली आल्मेडा आणि महाविद्यालयातील सहकाऱ्यांचे प्रोत्साहन व पाठबळ मोलाचे ठरले.

दोन लहान कन्यांचे संगोपन, घरची जबाबदारी आणि प्राध्यापिका म्हणून कर्तव्य बजावत त्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात आहे. वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधत केलेली ही शैक्षणिक कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन परिवार, शैक्षणिक क्षेत्र, मित्रपरिवार तसेच समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या संशोधनातून विद्यार्थ्यांना आणि समाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!