पशु वैद्यकीय अधिकारी गैरहजर औषधाविना जनावरे दगावत असल्याने ग्रामस्थांचा आक्रोश
Oplus_16908288
वार्ताहर – अनिल साळुंखे
मनोर,25/03/26
पालघर जिल्ह्यातील हमरापुर गावात पशुवैद्यकीय दवाखान्यात नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे शेळ्या, मेंढ्या, गाई व म्हशी यांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने अनेक जनावरे औषधाविना दगावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, दवाखान्यात अधिकारी उपलब्ध नसल्याने आजारी जनावरांना तातडीची सेवा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले की वारंवार संपर्क साधूनही अधिकारी प्रतिसाद देत नाहीत.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी
गावातील शेतकरी व पशुपालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच दवाखान्यात नियमितपणे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया,
सदर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर सध्या अतिरिक्त कामकाजाचा भार असल्यामुळे हमरापुर येथे पुरेसा वेळ देणे शक्य झाले नाही. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून येत्या एक तारखेपासून हमरापुर येथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात येईल. पशुपालकांना नियमित व तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे.
डॉ. प्रकाश हसनालकर,
जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी
प्रतिक्रिया,
आमच्या जनावरांवरच आमचा संसार चालतो. पण वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. शेळ्या, मेंढ्या, गाई आजारी पडल्यावर आम्ही हवालदिल होतो. काही जनावरे औषधाविना दगावली आहेत, त्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नियमित सेवा सुरू करावी आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी.अशी आमची मागणी आहे.
कमलेश गवळी, शेतकरी, हमरापुर