*वसई-विरारच्या आयु्क्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती*
*थेट आयएएस आयुक्तांच्या आमदार राजन नाईक यांच्या मागणीला यश*
अनिरुद्ध मिश्रा
नालासोपारा, दि. ३१ (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्यासाठी थेट आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. महापालिकेच्या आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
वसई-विरार शहरातील बेकायदा बांधकामांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारभारात शिस्त आणण्यासाठी आणि वसई-विरारच्या उज्ज्वल भविष्यासाठी थेट आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २४ फेब्रुवारी रोजी पत्र देऊन आयएएस अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा आग्रह धरला होता. या प्रयत्नांना यश आले.
नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी लातूर जिल्हाधिकारी व पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कार्य केले आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. लातूरच्या जिल्हाधिकारीपदावर कार्यरत असताना आरोग्य व कल्याण केंद्र श्रेणीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
आमदार राजन नाईक यांनी नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.


