*नागरी संरक्षण दलामार्फत हवाई हल्ला दुर्घटना नियंत्रणाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक व ब्लॅक आउट मोहिमेचे आयोजन*
Oplus_16908288Oplus_16908288
*पालघर,* दि. ९ एप्रिल २०२६ : महाराष्ट्र शासन गृह विभाग (विशेष) अंतर्गत नागरी संरक्षण दल, जिल्हा पालघर यांच्या वतीने बोईसर येथे गुरुवार, दि. ९ एप्रिल २०२६ रोजी हवाई हल्ला दुर्घटना नियंत्रणाबाबत मॉक ड्रिल तसेच ब्लॅक आउट मोहिमेचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.
जिल्ह्याचे उपनियंत्रक मा. काशिनाथ आर. कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ वाजता बोईसर एस.टी. आगार येथे सदर मॉक ड्रिल पार पडली. युद्धजन्य परिस्थितीत नागरी वस्तीवर हवाई हल्ला झाल्यास निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती आणि त्यावेळी नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांची प्रथम प्रतिसादक म्हणून भूमिका किती महत्त्वाची ठरते, याचे प्रभावी प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
या मॉक ड्रिलमध्ये आकाशातून बॉम्बहल्ला झाल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून लोकवस्तीमध्ये झालेला स्फोट, लागलेली आग, इमारत कोसळणे तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांची सुटका यांचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे, तसेच NDRF जवानांनी इमारतीत व ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
तसेच जखमी नागरिकांना डॉक्टरांच्या मदतीने तातडीने ट्रायज करून रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया देखील सादर करण्यात आली. या उपक्रमातून नागरिकांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती होऊन आपत्कालीन परिस्थितीत योग्य व तत्पर प्रतिसाद देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
यानंतर सायंकाळी ८ वाजता खोदाराम बाग परिसरातील एकूण १६ सोसायट्यांमध्ये “ब्लॅक आउट” मोहिमेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. युद्धसदृश्य परिस्थितीत परिसरात पूर्ण अंधार करून शत्रूची दिशाभूल कशी करता येते, याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले.
या उपक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बोईसर एस.टी. आगार प्रशासन, पोलीस विभाग, होमगार्ड, अग्निशमन दल, तारापूर, NCC, BARC सुरक्षा विभाग, TIMA, तारापूर महाराष्ट्र साईट, TATA Steel Global Wire India CSR Council तसेच CISF यांसह एकूण ३५ शासकीय व निमशासकीय संस्थांनी सहभाग नोंदविला.
सदर मॉक ड्रिल नागरी संरक्षण दलातील स्वयंसेवक, मास्टर ट्रेनर, उपमुख्य क्षेत्ररक्षक, विभागीय क्षेत्ररक्षक तसेच कार्यालयीन अधिकारी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाली.