कृती आराखडा तयार करून नागरिकांना तातडीची मदत देणार* *….पालकमंत्री गणेश नाईक*


  • *कृती आराखडा तयार करून नागरिकांना तातडीची मदत देणार*
    Oplus_16908288
    Oplus_16908288

    *….पालकमंत्री गणेश नाईक*

पालघर दि ९ जुलै २०२६: वसई-विरार परिसरातील पूरस्थिती ही केवळ अतिवृष्टीचा परिणाम नसून गेल्या अनेक दशकातील अनियोजित शहरीकरण, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे आणि पर्यावरणीय असमतोल यांचा एकत्रित परिणाम असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील ससुनवघर (जे. के. टायर), नालासोपारा, नायगाव (पू.) ,चिचोंडी फाटा / सनसिटी वसई (प.) / गालानगर (डॉनलेन) / धानिवबाग (बुलेट ट्रेन परिसर) / डि-मार्ट , पुर प्रवणक्षेत्र, सफाळे, केळवा-धवांगेपाडा, बिडको / विरेंद्रनगर या ठिकाणी पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला
पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नागरिकांना तातडीची मदत, जलद पंचनामे आणि दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणार असल्याचे सांगीतले
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, सर्वश्री आमदार राजेंद्र गावित, राजन नाईक, स्नेहा दुबे पंडित, जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड, वसई विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी .पी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू उप वनसंरक्षक निरंजन दिवाकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .
पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, वसई-विरार शहरातील पूरस्थितीचा सॅटेलाइट व ड्रोन सर्वेक्षणाद्वारे सखोल अभ्यास करून पुढील १५ ते २० दिवसांत सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पर्यावरण, वन, महसूल तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन पूरनियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील.
पूरग्रस्तांना तातडीचा दिलासा देण्यासाठी महसूल विभाग आणि महानगरपालिकेच्या संयुक्त पथकांकडून युद्धपातळीवर पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून आवश्यक आर्थिक मदत लवकरात लवकर वितरित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. घरगुती साहित्य, शैक्षणिक साहित्य आणि अत्यावश्यक वस्तूंचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून शक्य ती मदत देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
वीजपुरवठ्याबाबत बोलताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, अनेक ठिकाणी वीज वितरण केंद्रे आणि डीपी पाण्याखाली असल्याने पुरेसे पाणी ओसरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू करणे धोकादायक ठरेल. मात्र नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीला शक्य तितक्या वेगाने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दीर्घकालीन उपाययोजनांबाबत बोलताना त्यांनी वसई-विरार शहरातील भूमिगत ड्रेनेज व्यवस्था, अनियोजित बांधकामांवर नियंत्रण आणि शाश्वत नगररचना यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगीतले.
पर्यावरणीय बदल आणि हवामान संकटाचा उल्लेख करताना पालकमंत्री गणेश नाईक यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले. राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टिश्यू कल्चरच्या माध्यमातून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ येथे अत्याधुनिक रोपवाटिका उभारल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील वनक्षेत्र २१ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी जनसहभाग अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!