नागरिकांना दिलासा
मनोर मंडळ अधिकारी क्षेत्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर, उत्साहात संपन्न
महसूल समाधान शिबिरात ११७० दाखल्यांचे वाटप
वार्ताहर अनिल साळुंखे


मनोर,14/03/26
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत मनोर मंडळ अधिकारी क्षेत्रात लाल बहादूर शास्त्री हायस्कूल मनोर पटांगण येथे समाधान शिबिर उत्साहात पार पडले. नागरिकांच्या महसूल विषयक आणि अनेक शासकीय विभागातील प्रलंबित समस्या जागेवरच सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत सावरा व आमदार विलास तारे उपस्थित होते. तसेच भाजप सचिव संतोष जनाठे, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील, सरपंच चेतन पाटील आणि माजी उपसरपंच साजिद खतीब यांचीही प्रमुख उपस्थिती होती.प्रशासकीय स्तरावर उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसीलदार रमेश शेंडगे, अधिकारी संजय भोये तसेच मंडळ अधिकारी सुशांत ठाकरे यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दाखल्याचे वाटप करण्यात आले
या शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून ७/१२ उतारे, फेरफार प्रकरणे, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, ई-मोजणी अर्ज तसेच विविध शासकीय योजनांबाबत मान्यवरांकडून मार्गदर्शन देण्यात आले. शिबिरादरम्यान सर्व विभागांच्या माध्यमातून एकूण ११७० नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नागरिकांना दाखले प्रदान करण्यात आले.
गाव पातळीवर महसूल विभागाच्या सेवा
या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना गावपातळीवरच महसूल विभागाच्या सेवा उपलब्ध झाल्या असून अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास मदत झाली. शासनाच्या या उपक्रमाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

