नियोजनशून्यतेचा फटका
वांद्री पुलावर दुरुस्ती सुरू आणि महामार्गावर १० किमीपर्यंत भीषण कोंडी
वार्ताहर, नाझीम खतीब

मनोर,31/03/26
मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील वरई येथील वांद्री नदीवरील पुलाच्या दुरुस्तीमुळे सलग दोन दिवस भीषण वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. पुलापासून दोन्ही बाजूंनी तब्बल आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले असून महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त होत आहे.
रविवारी रात्रीपासून गुजरात वाहिनीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी मुंबईकडील अवजड वाहतूक गुजरात वाहिनीकडे वळवण्यात आली असून मुंबई दिशेकडे केवळ एकच मार्गिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे. परिणामी वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होऊन कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
पुलालगतच्या जुन्या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येत असला तरी अवजड वाहनांच्या गर्दीत ही वाहनेही अडकून पडत आहेत. त्यातच काही वाहनचालकांनी कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहतूक सुरू केल्याने परिस्थिती अधिकच बिघडली.
वाहन चालक, नागरिकांचा आरोप
महामार्ग पोलीसांना कोंडी नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने वाहनचालकांना तासन्तास रस्त्यावर अडकून राहावे लागले. रुग्णवाहिका, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. कोंडी होणार हे माहिती असूनही कोणतेही ठोस नियोजन करण्यात आले नाही. असा आरोप प्रवासी व रिक्षाचालक संघटनांनी केला आहे.
वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्याद
आखाती देशांतील युद्धसदृश परिस्थितीमुळे इंधनटंचाईची भीती असताना महामार्गावरील या कोंडीमुळे इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून मनोर ते वरई फाटा व ढेकाळे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचा व्यवसायही धोक्यात आला आहे.सातिवली उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांनी सहा महिने कोंडी सहन केली होती. ते काम पूर्ण होऊन अवघे तीन महिने उलटत नाहीत तोच आता वांद्री पुलाच्या दुरुस्तीमुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा त्रास सुरू झाला आहे.
प्रतिक्रिया,
महामार्ग सुरक्षा विभागाकडून कोंडी नियंत्रणासाठी दिवसा पाच आणि रात्री दहा ट्रॅफिक वार्डन नियुक्त करण्यात आले असून दहा अतिरिक्त पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. तीस वाहतूक पोलीस आणि पंधरा ट्रॅफिक वार्डन यांच्या समन्वयातून परिस्थिती हाताळण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पवन ठाकूर,
सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग
महामार्ग प्राधिकरणाचे शून्य नियोजन
प्रत्यक्षात जमिनीवर नियोजनाचा पूर्णपणे अभाव दिसून येत असल्याने काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्ग, वेळापत्रक आणि वाहतूक व्यवस्थापनाचा ठोस आराखडा का तयार करण्यात आला नाही? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरण आणि वाहतूक पोलीस विभागाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास ही कोंडी आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

