बोईसर मध्ये भारत- रशिया सांस्कृतिक मैत्रीचा रंगारंग सोहळा; देशभक्ति गीतांनी भारावले वातावरण

बोईसर :- होळीच्या पवित्र निमित्ताने महाराष्ट्रातील बोईसर येथे आयोजित भारत-रशिया सांस्कृतिक मैत्री कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांनी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. भारतभूमीवर रचलेल्या अमर गीतांच्या सुरावटींनी संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमात रशियन कलाकारांनी जहाँ
डाल-डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा, हम हैं हिन्दुस्तानी, लंदन देखा, पेरिस देखा, मेरा जूता है जापानी, सर पे लाल टोपी रूसी यांसारखी गाजलेली देशभक्तीपर गीते तसेच राष्ट्रगीत भावपूर्ण रीतीने सादर करून उपस्थितांची मने जिंकली. साधारणपणे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांनाच ऐकायला मिळणारी ही गीते परदेशी कलाकारांनी इतक्या आत्मीयतेने सादर केल्याने उपस्थित नागरिक भावुक झाले. हे सर्व कलाकार ‘ओम शांती’ संस्थेशी अनेक वर्षांपासून स्वयंसेवक म्हणून जोडलेले असून निःस्वार्थ भावनेने सेवा कार्य करत आहेत. त्यांच्या सादरीकरणातून भारताबद्दलचा आदर आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवत होती. या कार्यक्रमाची प्रेरणा विराज
प्रोफाइल्स (विराज इंटरनॅशनल)चे मालक श्री. नीरज कोचर यांना माउंट आबू येथे भेट दिल्यानंतर मिळाली. तेथे त्यांनी असाच भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पाहिला आणि बोईसरमध्येही असा उपक्रम आयोजित करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. गेली ३५ वर्षे बोईसरमध्ये वास्तव्यास असलेल्या श्री. कोचर यांनी, मी या भागाचा नागरिक असल्याने आपल्या परिसरातही दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा, अशी भावना व्यक्त केली.
यानंतर त्यांनी संतोष दीदी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तत्काळ बोईसरमध्ये कार्यक्रम घेण्यास संमती दिली. पुढे ‘मामा’ यांनी आपल्या कंपनीतील तसेच विराज इंटरनॅशनलमधील सहकाऱ्यांशी चर्चा करून अवघ्या दोन दिवसांत या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
अल्पावधीत आयोजित या भव्य सोहळ्यास बोईसर व परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत-रशिया सांस्कृतिक मैत्री, देशभक्तीपर गीतांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आणि सेवाभावी कलाकारांचे समर्पण यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

