मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भीषण अपघात प्रकरण उघड; १० दिवसांत आरोपी अटकेत
- ढेकाळे येथील वाघोबा खिंडीत तिघांचा मृत्यू; एलसीबीच्या तांत्रिक तपासातून ट्रक चालक जीगुजरातमधून जेरबंद

मनोर,02/04/26
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर २१ मार्च रोजी घडलेल्या भीषण अपघात प्रकरणात पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत आरोपीचा शोध घेत अटक केली आहे. या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे दर्शन घडले आहे.
२१ मार्च रोजी सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सुर्या भरत माघी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी भयावह दृश्य निर्माण झाले होते.
अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. माहिती मिळताच महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला. आरोपीचा माग काढणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पीएसआय सावंत देसाई आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासावर भर देत परिसरातील ६ ते ७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच महामार्गावरील टोलनाके, वजनकाटे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा करून तपासाची दिशा निश्चित केली.
या सखोल तपासाअंती ३१ मार्च रोजी गुजरातमधील भिलाड–नारोली परिसरातून आरोपी राजेंद्र प्रसाद (वय ३६, रा. उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील १६ चाकी ट्रक जप्त करण्यात आला असून वाहन मनोर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
या प्रकरणातील जलद तपास आणि आरोपीचा शोध ही पोलिसांसाठी उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. दरम्यान, मुंबई–अहमदाबाद महामार्गावर वाढत्या अपघातांची मालिका चिंताजनक ठरत असून वेगमर्यादा उल्लंघन, वाहतूक नियमांचे पालन न करणे आणि अपुऱ्या सुरक्षात्मक उपाययोजना ही प्रमुख कारणे समोर येत आहेत.
या दुर्घटनेमुळे एका कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.

