*वसई तालुक्यासाठी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर*
*भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीला यश*

नालासोपारा, दि. ३ (प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन वसई तालुक्यात अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. राज्य सरकारने गुरुवारी शासन निर्णय काढून वसई तालुक्यासाठी अपर तहसीलदार कार्यालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नालासोपारा व विरार शहरापासून वसई येथील तहसीलदार कार्यालय दूर असल्यामुळे नालासोपारा किंवा विरार शहरात स्वतंत्रपणे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी आमदार राजन नाईक यांनी २८ जानेवारी २०२५ व १ ऑगस्ट २०२५ रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. त्याचबरोबर कोकणातील विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ११ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या आढावा बैठकीतही स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालयासाठी आग्रह धरला होता. त्यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले होते.
राज्य सरकारच्या महसूल विभागातर्फे सुधारीत आकृतीबंध मंजुरीबाबत काल गुरुवारी शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यात वसई तालुक्यात अपर तहसीलदार कार्यालय (स्वतंत्र) मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच वसई तालुक्यात अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर केल्यामुळे नालासोपारा किंवा विरार यापैकी एका ठिकाणी स्वतंत्रपणे अपर तहसीलदार कार्यालय सुरू होईल, असा विश्वास आमदार राजन नाईक यांनी व्यक्त केला. या मागणीला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आमदार राजन नाईक यांनी आभार मानले आहेत.

