वाड्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले गजाआड
घरफोडीच्या आणखी गुन्ह्यांची दिली कबुली ; चोरी गेलेले दागिनेही केले जप्त
वाडा/प्रतिनिधी : तालुक्यातील देवघर येथील नरेश पाटील हे दि.28 मार्च रोजी त्यांच्या नातेवाईकांकडे उत्तर कार्याच्या कार्यक्रमासाठी गेले असताना घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून घराच्या बेडरूम मधील लाकडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या गुन्ह्य़ाचा मोठ्या शिताफीने वाडा पोलिसांनी तपास करून चोरट्यांना गजाआड केले आहे.तपास सुरू असताना अंधाराचा फायदा घेत प्रणित हा चोरटा फरार झाला होता मात्र 24 तासाच्या आतच त्याच्या मुसक्या आवळून त्याला त्याच्या साथीदारांसह गजाआड केले आहे.
प्रणित ऊर्फ भुया ऊर्फ टोल्या सुनील पाटील,अजित उर्फ बाली प्रकाश पाटील, सारिका पाटील या तिघां चोरट्यांना गजाआड केले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवघर गाव व परिसरात यापूर्वी अशाच प्रकारे चो-या झाल्या बाबत गुन्हे दाखल असल्याने सदर गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्य़ाचा तपास करीत असताना देवघर गावातील इसम प्रणित ऊर्फ भुया ऊर्फ टोल्या सुनील पाटील हा काहीएक कामधंदा न करता ऐशौआरामीचे जीवन जगत असल्याची माहिती मिळाल्याने त्याचेवर पाळत ठेवून तसेच त्याच्या हालचालींचे निरीक्षक केले असता त्यानेच सदरच्या चो-या केल्या असल्याचा दाट संशय निर्माण झाला होता.त्याच वेळी गुप्त बातमीदारांना दिलेल्या माहितीनुसार प्रणित याचे जवळ गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने दोन पंचासमक्ष त्याच्या राहत्या घराची झडती घेत त्याचे घराचे समोरील पत्र्याच्या शेड खाली असलेल्या लाकडी दिवानात एक देशी बनावटीचा गावठी कट्टा ( पिस्तूल)मिळून आला.त्याच्याकडे गावठी कट्ट्याबाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा अग्नी शस्त्र परवाना नसल्याचे सांगितले. त्याच वेळी तो पोलिसांची नजर चुकवून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता त्याचा कसून शोध घेतला असता प्रविण व त्याचा साथीदार अजित उर्फ बाली प्रकाश पाटील( वय 35) व त्यांची आणखी एक साथीदार सारिका पाटील हिनेही गुन्ह्यात मदत केल्याने या तिघांना पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून 2 लाख 16 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या चोरी बरोबरच आणखी चार गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.
ही यशस्वी कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दयानंद पाटील, गुरुनाथ गोतारणे, विजय मढवी, गजानन जाधव, संतोष वाकचौरे,चेतन सोनावणे, सचिन भोये यांच्या पथकाने केली.अधिक तपास सागर मालकर करीत आहेत.
वाड्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले गजाआड घरफोडीच्या आणखी गुन्ह्यांची दिली कबुली ; चोरी गेलेले दागिनेही केले जप्त
- जाहिरात
- नवीनतम पोस्ट
- POLL



