टीबी मुक्त भारत अभियान : पालघर जिल्हाधिकारी ‘निक्षय मित्र’ बनल्या; क्षयरुग्णांना मदतीचे आवाहन
पालघर दि १८:-टीबी मुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हास्तरीय क्षयरोग मंच तसेच क्षयरोग सहव्याधी आढावा बैठक दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, सर्व वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), अन्न व औषध प्रशासन अधिकारी, वेदांत वैद्यकीय महाविद्यालयाचे श्वसनरोग विभाग प्रमुख डॉ. घोरपडे (दृकश्राव्य माध्यमाद्वारे), तसेच सर्व गटविकास अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्ष-किरण तपासणी, न्युक्लिक अॅसिड प्रवर्धन चाचणी (एनएएटी), बहुऔषध प्रतिरोधक (एमडीआर) रुग्णांचे प्रमाण व उपचारस्थिती, औषधसाठा व उपलब्धता आदी विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ‘निक्षय मित्र’ बनून १० क्षयरुग्णांना प्रथिनयुक्त अन्नधान्य टोपल्यांचे वाटप केले. तसेच बी-पाल्म उपचार पूर्ण करून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांचा ‘टीबी चॅम्पियन’ म्हणून गौरव करण्यात आला.
जागृती, संवाद व सामाजिक सहभाग (एसीएसएम) उपक्रमांतर्गत सर्व क्षयरोग मंच सदस्यांना टीबी मुक्त भारत अभियानाचा लोगो असलेले पेनस्टँड देऊन कार्यक्रमाची सातत्याने आठवण ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
सध्या पालघर जिल्ह्यात एकूण २६५३ क्षयरुग्ण उपचाराखाली असून, त्यापैकी ८५० रुग्णांना आजपर्यंत ३५८४ प्रथिनयुक्त अन्नधान्य टोपल्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात अभियान सुरू झाल्यापासून एकूण ६९४५ टोपल्यांचे वितरण करण्यात आले असून, केवळ सन २०२५ मध्येच ३५८४ टोपल्या देण्यात आल्या आहेत. या उपक्रमात विविध सामाजिक संस्था तसेच कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत विविध कंपन्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
*निक्षय मित्र म्हणजे काय?*
पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना औषधोपचारासोबतच प्रथिनयुक्त आहाराचीही गरज असते. शासनाकडून रुग्णांना दरमहा १००० रुपये पोषण सहाय्य दिले जाते. याशिवाय समाजातील दानशूर व्यक्ती, अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्था, उद्योगसमूह आदी कोणीही ‘निक्षय मित्र’ बनून रुग्णाच्या उपचार कालावधीत प्रथिनयुक्त अन्नधान्य टोपली देऊन थेट मदत करू शकतात.
मा. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी अधिकाधिक नागरिकांनी ‘निक्षय मित्र’ बनून क्षयरुग्णांना आधार द्यावा, असे आवाहन केले. सामूहिक सहभागातूनच पालघर जिल्हा टीबी मुक्त करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

