*”हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त*
*वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन*

अनिरुद्ध मिश्रा :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त २८ फेब्रुवारी, २०२६ व ०१ मार्च, २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमाच्या जनजागृतीच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नवघर-माणिकपूर प्रभाग समिती ‘एच’ अंतर्गत नवघर येथील डॉ.के.ब.हेगडेवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शौर्याची, बलिदानाची माहिती तसेच त्यांच्या जीवनातील नैतिक मुल्यांवर आधारित सामाजिक ज्ञान यांविषयीची माहिती महानगरपालिका क्षेत्रातील जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच यावेळी सदरील उपक्रमाच्या अनुषंगाने जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचन व निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या विषयी घोषणावाक्यांचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती देऊन प्रभात फेरीही काढण्यात आल्या. या विविध स्पर्धा व उपक्रमांद्वारे विद्यार्थीवर्गाला श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली व या माध्यमातून शासनामार्फत आयोजित “हिंद-दी-चादर” या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाबाबत जनजागृतीही करण्यात आली.
सदर उपक्रमांतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मनपा कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून दि.१६ फेब्रुवारी रोजी प्रभाग समिती ‘ई’ कार्यक्षेत्रातील यशवंत गौरव परिसरात स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रभाग समिती ‘सी’ कार्यक्षेत्रातील जीवदानी मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक सहभागी झाले होते. तसेच यापूर्वी प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत कामण गाव परिसर तसेच दि.१५ फेब्रुवारी रोजी गोखीवरे गाव परिसर येथेही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
सदर उपक्रमांतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत ३९ वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत या शिबिरांचा लाभ ३०५३ लाभार्थ्यांनी घेतला आहे.
त्याचप्रमाणे दि.१५ फेब्रुवारी रोजी वसई विरार शहर महानगरपालिका सार्वजनिक वाचनालय विभाग यांचेमार्फत बंजारा समाज मनवेलपाडा यांच्या सहकार्याने आयोजित श्री गुरु तेग बहादुर साहिबजी व बंजारा समाज यांचे ऐतिहासिक संबंध या अनुषंगाने गायन व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वसई विरार शहर महानगरपालिकेचे सन्मा.महापौर श्री.अजीव पाटील हे उपस्थित होते. तसेच विविध गायक मंडळी, महानगरपालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते.
“हिंद-दी-चादर” कार्यक्रमानिमित्त महानगरपालिका क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता या तिन्ही महत्वाच्या बाबींशी निगडीत उपक्रमांव्दारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या अलौकिक कार्याला सेवाभावी कामांतून आदरांजली अर्पण केली जात आहे. या उपक्रमांचा उद्देश तरुण पिढीने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी दिलेले योगदान स्मरणात ठेवावे, तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक मुल्यांची जपणूक करावी हा आहे.
“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि.२८ फेब्रुवारी, २०२६ व दि.०१ मार्च, २०२६ रोजी ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या भव्य “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत नागरिकांना करण्यात येत आहे.

