*विरार, नालासोपाऱ्यात रेल्वे उड्डाणपुल; हायवेपासून काँक्रीट रस्ते प्राधान्याने*
*`एमएमआरडीए’चा आढावा बैठकीत निर्णय; आमदार राजन नाईक यांची बैठक*

अनिरुद्ध मिश्रा /नालासोपारा: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार स्टेशन आणि नालासोपारा स्टेशनपर्यंत येणारे दोन्ही काँक्रीट रस्ते आणि विराटनगर व ओसवालनगरी येथील रेल्वे उड्डाणपुलांची कामे सर्वोच्च प्राधान्याने करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या `वॉर रुम’च्या निर्देशानुसार भाजपाचे आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर `एमएमआरडीए’ने घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर वसई तालुक्यात रिंगरूटसाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांना `एमएमआरडीए’च्या माध्यमातून वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल यांच्याकडे `एमएमआरडीए’च्या वसई व पालघर परिसराची धुरा सोपविली आहे. त्यांच्या उपस्थितीत मुंबईत आज बैठक झाली. आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे बोलाविलेल्या या बैठकीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, `एमएमआरडीए’चे अधीक्षक अभियंता चेतन बेंडाळे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे, महापालिकेचे नगर अभियंता प्रदीप पाचंगे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत वसई-विरार महापालिका क्षेत्रात `एमएमआरडीए’कडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महामार्गावरून येणाऱ्या दोन्ही काँक्रीट रस्त्यांबाबत महापालिकेने खर्चाचा निश्चित आराखडा सादर करावा. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती रुबल अगरवाल यांनी दिली. दोन काँक्रीट रस्ते आणि विराटनगर व ओसवालनगरी उड्डाणपुलाची कामे `एमएमआरडीए’कडून सर्वोच्च प्राधान्याने केली जातील, अशी ग्वाही रुबल अगरवाल यांनी दिली.
*सहा ट्रॅफिक जंक्शन उड्डाणपुलांनाही चालना*
गोखिवरे, चंदननाका जंक्शन, मनवेलपाडा नाका ते फुलपाडा जंक्शन, माणिकपूर ते बाभोळा नाका, वसंत नगरी ते एव्हरशाईन आणि नारिंगी (साईनाथनगर) येथील ट्रॅफिक जंक्शन पुलांच्या कामांबाबत महापालिकेने खर्चाचा नवा सुधारित अंदाज सादर करावा, असे निर्देश रुबल अगरवाल यांनी दिले. अशी माहिती भाजपा जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.

