पालघर मध्ये भीषण अपघात नांडोंरे येथील दोन महिलाचा जागीच मृत्यू.
Oplus_16908288
पालघर दि २० : पालघर-नंडोरे मार्ग वर अपघात घडला. रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या दोन महिलांना नंडोरे येथील अंगणवाडी दरम्यान भरधाव पिकअप टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, पालघर परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
आज शुक्रवारची सुट्टी असल्याने नंडोरे परिसरातील महिला पालघरचा आठवडी बाजार करण्यासाठी आल्या होत्या. बाजार आटपून दुपारी नंडोरे येथे आपल्या घरी जात असताना हा अपघात घडला. लता निलेश तरे (वय ४५, रा. पिल्हेर पाडा, नंडोरे) आणि बेबी चंद्रकांत जाधव (वय ६५, रा. नवापाडा, नंडोरे) अशी मृत महिलांची नावे आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या पिकअप टेम्पोमध्ये दोन जण होते. एक २४ वर्षीय शिकाऊ चालक हे वाहन चालवत होता. मृत महिला रस्त्याच्या उजव्या बाजूने सुरक्षितपणे चालत होत्या. मात्र, नंडोरेकडून नवापाडाच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि डाव्या बाजूने जाणारे वाहन अचानक उजव्या बाजूला आले. वेगात असलेल्या पिकअपची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.
अपघातानंतर तातडीने मदतकार्य करत लता तरे यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात, तर बेबी जाधव यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, संबंधित शिकाऊ चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.