ग्रामपंचायत स्तरावर ८ ते २२ मार्चदरम्यान ‘जल महोत्सव’; पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत करण्यावर भर


 

ग्रामपंचायत स्तरावर ८ ते २२ मार्चदरम्यान ‘जल महोत्सव’; पाणीपुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत करण्यावर भर

Oplus_16908288
आजचे प्रवचनकार

पालघर : ग्रामीण पाणी पुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व सक्षम करण्यासोबतच पाणी व्यवस्थापनात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत ‘जल महोत्सव’ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली असून ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांना देखील या योजनेअंतर्गत नळजोडण्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

या जल महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गावांमध्ये ‘लोकजल उत्सव’ साजरा करून पाणी व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार असून हा उपक्रम पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल. ग्रामसभा व पाणी समित्यांच्या माध्यमातून पाणी संवर्धन व पाणीपुरवठा व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे.

याचबरोबर महिलांच्या सहभागातून फिल्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून जल गुणवत्तेची तपासणी, गावातील जलस्रोतांचे संरक्षण, पाणी बचतीचे महत्त्व आणि पाणी व्यवस्थापनातील नागरिकांची भूमिका याबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलस्रोतांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

“ग्रामीण पाणी पुरवठा व्यवस्था अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी तसेच गावातील पाणीपुरवठा योजना सातत्याने कार्यरत राहण्यासाठी सामुदायिक सहभाग वाढविणे आवश्यक आहे. या उद्देशाने ८ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे,” असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अतुल पारसकर यांनी सांगितले.

दरम्यान, या कालावधीत गावांमध्ये जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, स्वच्छता मोहीम, तसेच पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतरण करण्यात येणार आहे. ग्रामस्थांकडून सामुदायिक जलप्रतिज्ञा घेऊन पाणी संवर्धनाबाबत सामूहिक बांधिलकी व्यक्त केली जाणार असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सुरूम यांनी दिली.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!