देहेरे येथे ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन


देहेरे येथे ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

Oplus_16908288

पालघर, वार्ताहर

जव्हार तालुक्यातील देहेरे येथील समाजमंदिरात रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. खावडा ट्रान्समिशन प्रोजेक्टच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे वाचनालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम ठरणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीशचंद्र सखाराम भोये यांनी भूषविले. त्यांच्या हस्ते वाचनालय व अध्ययन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप जिल्हा सरचिटणीस ज्योती हरीशचंद्र भोये यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देहेरे-देवगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जितेश हरीशचंद्र भोये, उपसरपंच सुमन दुर्गादास महाले तसेच ग्रामसेवक अमित अशोकराव बोर्डे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासत स्पर्धा परीक्षांसाठी जिद्द आणि चिकाटीने तयारी करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी विविध संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक पुस्तके, वर्तमानपत्रे तसेच इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे देहेरे व परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक, महिला बचत गट तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन देहेरे-देवगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!