*नालासोपाऱ्यातील भोगवटादार २ मधील इमारतींच्या ‘सातबारा’ प्रश्नी तोडगा*
*आमदार राजन नाईक यांच्या विधानसभेतील प्रश्नोत्तरी अनुषंगाने महसूल मंत्र्यांनी

घेतली निर्णायक बैठक*
अनिरुद्ध मिश्रा /नालासोपारा (प्रतिनिधी) : नालासोपारा मतदारसंघातील भोगवटादार वर्ग २ वरील गृहनिर्माण सोसायट्यांच्या सातबारा हस्तांतरणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी मंत्रालयात आमदार राजन नाईक यांच्यासोबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विधानसभा अधिवेशनात भाजपचे आमदार राजन नाईक यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मंत्र्यांनी सदनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता म्हणून ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भोगवटादार वर्ग २ मधील जमिनींवर बांधलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासमोरील तांत्रिक अडचणींवर सखोल चर्चा झाली. या इमारतींच्या नावावर सातबारा करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत – एक, भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये जमिनीचा समावेश आणि दुसरे, सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या नावे मालकी हस्तांतरण. मात्र, एक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी सुरू होत नसल्याने कोंडीची परिस्थिती निर्माण होते, असे आमदार राजन नाईक यांनी मांडले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या कायदेशीररित्या मालकी हक्काच्या धारक असल्याने त्यांना न्याय मिळायलाच हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विधानसभेत दिलेली वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.
बैठकीत असे निदर्शनास आले की, या इमारतींपैकी काहींचे रीतसर अभिहस्तांतरण झाले आहे. तर काहींना मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) आदेश मिळाले आहेत. मात्र भोगवटादार वर्ग-२ असल्याने त्या आदेशानुसार नोंदणी व सातबारा हस्तांतरण होत नाही. भोगवटा वर्ग- २ जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर सोसायटीचे नाव नोंदविण्यास कायदेशीर अडथळा नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सोसायट्यांच्या प्रतिनिधींसह बैठक घेऊन प्रकरणनिहाय तोडगा काढावा. सातबारा उताऱ्यावर सोसायटींच्या नावांची नोंद करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. काही विशिष्ट तांत्रिक अडचणी असल्यास राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश मंत्र्यांनी दिले.
या बैठकीला आमदार राजन नाईक यांच्याबरोबरच नगरसेवक पंकज देशमुख यांचीही उपस्थिती होती. कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका अतिरिक्त आयुक्त, सहनिबंधक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
नालासोपारा मतदारसंघातील अनेक जुन्या इमारती जीर्ण झाल्या असून, त्यांच्या पुनर्विकासाची तातडीची गरज आहे. भोगवटादार वर्ग २ मधील जमिनींच्या प्रश्नामुळे अनेक कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या निर्णयामुळे अशा शेकडो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.

