पक्षी संवर्धनाचा संदेश देणारा आदिवासी विद्यार्थ्यांचा अभिनव उपक्रम

Oplus_16908288वार्ताहर – अनिल साळुंखे
मनोर,18/05/26
पर्यावरण संवर्धनासोबतच पक्षी संरक्षणाचा सामाजिक संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम पालघर तालुक्यातील दुर्गम दारशेत चौकीपाडा परिसरात राबविण्यात आला. येथील वीणा वसंत वैद्य वाचनालयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून पक्ष्यांसाठी आकर्षक घरटी तयार करून निसर्गप्रेमाचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पक्ष्यांना निवारा, अन्न व पाण्याची टंचाई भासत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विविध साहित्यांच्या साहाय्याने पक्ष्यांसाठी सुरक्षित व सुंदर घरटी तयार केली. तयार करण्यात आलेली घरटी वाचनालय परिसरातील झाडांवर बांधण्यात आली असून, त्यामध्ये पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील पक्ष्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलता आणि जीवसृष्टीप्रती असलेली आपुलकी कृतीतून दाखवून दिली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत उपक्रम यशस्वी केला. वाचनालयाचे दिनेश गुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
दारशेत चौकीपाडा येथील या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, पक्षी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात या चिमुकल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

