पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये संघटन सुदृढीकरणाची हालचाल; जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा रंगली

पालघर | प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पालघर जिल्ह्यात संघटन बळकट करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे निरीक्षक म्हणून डॉ बलल्या नायक,यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते सध्या जिल्ह्यात दौरे करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि त्याआधारे नवीन जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची निवड करणे हा आहे. डॉ. नायक विविध तालुक्यांमध्ये भेटी देत असून, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा, नाराजी आणि संघटनात्मक मुद्द्यांचा आढावा घेत आहेत.
दरम्यान, पालघर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी स्पर्धा चांगलीच रंगू लागली आहे. या पदासाठी कॅप्टन सत्यम ठाकूर आणि मनोज पाटील यांची नावे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत. मनोज पाटील हे माजी जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील यांचे सुपुत्र असल्याने त्यांनाही संघटनेत अनुभवाचा वारसा असल्याचे मानले जाते.
मात्र, जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवचैतन्य मिळू शकते आणि काँग्रेसला पुन्हा एकदा जिल्ह्यात चांगले दिवस येऊ शकतात, अशी भावना काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे पालघर जिल्हा काँग्रेसमध्ये उत्सुकता वाढली असून, पक्ष नेतृत्वाकडून कोणावर विश्वास दाखवला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसची राजकीय दिशा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

