मनोर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांचा अभाव
गरोदर महिलांची गैरसोय तीव्र जनतेत आक्रोश


वार्ताहर – अनिल साळुंखे
मनोर,15/04/26
पालघर जिल्ह्यातील मनोर येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघडकीस आली असून स्त्रीरोग तज्ञांच्या अभावामुळे गरोदर महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नियमित तपासणीसाठी येणाऱ्या महिलांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये तसेच बाहेरील परिसरात महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक महिला सकाळपासून रुग्णालयात थांबूनही वेळेवर तपासणी न मिळाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे गरोदर महिलांमध्ये भीती आणि अस्वस्थता वाढली आहे.
तज्ञ नसल्याने आरोग्यावर परिणाम
स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध नसल्यामुळे आवश्यक तपासण्या रखडल्या आहेत. नियमित तपासणी न झाल्यास माता आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा
या प्रकारामुळे ग्रामीण भागात आजही वैद्यकीय तज्ञांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र झाली आहे.
जनतेत तीव्र आक्रोश तातडीची मागणी
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती करावी. अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

