छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर चालतवड येथे उत्साहात संपन्न.


जव्हार प्रतिनिधी
–
राज्य शासनाच्या महसूल विभाग उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मौजे चालतवड येथील ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी नागरिकांना एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
या शिबिरामध्ये विविध दाखल्यांचे वाटप, ७/१२ अद्ययावत करणे, अॅग्री स्टॅक नोंदणी, पीएम किसान (PM-KISAN) योजनेबाबत मार्गदर्शन, प्रलंबित फेरफार निकाली काढणे, वर्ग २ च्या सातबाऱ्याचे वर्ग १ मध्ये रूपांतर, तुकडेबंदी संदर्भातील प्रकरणे, वृद्धापकाळ व निराधार योजना तसेच अकृषिक तरतुदी सुधारणा यांसारख्या विषयांवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली.
तसेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग, पंचायत समिती आणि इतर विभागांच्या विविध योजनांबाबत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्योतीताई भोये (माजी सभापती), दिलीप पाडवी (माजी उपसभापती), ग्रामपंचायत साखरशेत सरपंच अनिता चौधरी, उपसरपंच रुकेश कव्हा, तहसीलदार, नायब तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी ,तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदारांच्या हस्ते शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले तसेच नागरिकांना विविध महसूल दाखलेही देण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार भोये म्हणाले की, “राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय सेवा सहज आणि तात्काळ मिळाव्यात हा या शिबिरांचा मुख्य उद्देश आहे. महसूल विभागातील प्रलंबित कामे गावातच सोडविण्यामुळे नागरिकांची धावपळ व वेळ वाचतो. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व आदिवासी बांधवांनी अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. शासनाच्या विविध योजना प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.

