जनगणना २०२७ साठी जिल्हा प्रशासन सज्ज* *जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*


* *जनगणना २०२७ साठी जिल्हा प्रशासन सज्ज*

*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड*

पालघर, दि. २८ एप्रिल : जनगणना 2027 ही भारताची 16 वी जनगणना आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली असून जनगणना 2027 साठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत आगामी जनगणना २०२७ संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली. देशातील ही १६ वी जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, मोबाईल अँप आणि CMMS पोर्टलच्या माध्यमातून दोन टप्प्यांत ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले की, यंदाची जनगणना पारंपरिक पद्धतीपासून एक पाऊल पुढे जात डिजिटल इंडियाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नागरिकांना स्वगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, https://se.census.gov.in या संकेतस्थळावरून घरबसल्या माहिती भरता येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील ८ तालुके, ३ नगरपरिषद व ४ नगरपंचायती मिळून एकूण १५ चार्ज कार्यालयांमार्फत ही मोहीम राबवली जाणार आहे. सुमारे २४.३० लाख लोकसंख्येची माहिती गोळा करण्यासाठी ३७१८ प्रगणक आणि ६३६ पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी ३४०१ घरयादी गट तयार करण्यात आले आहेत.
टप्प्याटप्प्याने काटेकोर अंमलबजावणी
जनगणना प्रक्रिया दोन प्रमुख टप्प्यांत पार पडणार आहे:
पहिला टप्पा – घरयादी व घर गणना
१ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वगणनेची संधी देण्यात येणार आहे. स्वगणना पूर्ण केल्यानंतर नागरिकांनी प्राप्त झालेला SE ID प्रगणकाला देणे आवश्यक असेल.
१६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणक घरभेटी देऊन ३३ मुद्द्यांवर माहिती संकलित करणार आहेत. यात घराची रचना, सुविधा, कुटुंबाची माहिती, जीवनशैली यांचा समावेश असेल.
दुसरा टप्पा – लोकसंख्या गणना:
यानंतर प्रत्यक्ष व्यक्तींची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे, ज्यामुळे अचूक व अद्ययावत लोकसंख्या डेटा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

ही संपूर्ण प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. मार्चपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणामध्ये चार्ज अधिकारी, फील्ड ट्रेनर, प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना स्वगणनेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. “अचूक माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमातून पारदर्शक आणि जलद जनगणना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!