मनोर परिसर हादरला भरधाव इनोव्हाची आई मुलाला जोरदार धडक आई जागीच ठार, मुलगा गंभीर


मनोर परिसर हादरला

भरधाव इनोव्हाची आई मुलाला जोरदार धडक

आई जागीच ठार, मुलगा गंभीर

Oplus_16908288

 

 

मनोर, 29/04/26
मनोर पोलीस ठाणे हद्दीतील पाडोसपाडा परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी सुमारे 8.15 वाजण्याच्या सुमारास गुजरात लेन परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा (क्र. MH48 AW 7209) कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या वाहनाने रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या प्रतिक्षा प्रभाकर पाडोसा (वय 40, रा. पाडोसपाडा, मनोर) यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या.

या अपघातात त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा तुषार प्रभाकर पाडोसा (वय 17) यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्या हातापायांना जबर मार लागला आहे. जखमी अवस्थेत त्याला तातडीने प्रथम मनोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच मनोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करत वाहतूक सुरळीत केली.

पादचारी पूल बांधण्याची नागरिकांकडून मागणी

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या पाडोसपाडा परिसरात यापूर्वीही अपघातांच्या घटना घडल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याने येथे तातडीने लोखंडी पादचारी पूल (फुटओव्हर ब्रिज) उभारण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!