वसई-विरारमधील विकास प्रकल्प `एमएमआरडीए’कडून मार्गी लागणार* *आमदार राजन नाईक यांच्या मागणीनंतर आढावा बैठक*


*वसई-विरारमधील विकास प्रकल्प `एमएमआरडीए’कडून मार्गी लागणार*

*आमदार राजन नाईक यांच्या मागणीनंतर आढावा बैठक*

अनिरुद्ध मिश्रा /नालासोपारा, दि. ३० (प्रतिनिधी): वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर `एमएमआरडीए’कडून शहरातील विकास प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन `एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी भाजपचे आमदार राजन नाईक यांच्या मागणीवर दिले. त्याचबरोबर संबंधित कामांसाठी`एमएमआरडीए’कडून नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

`एमएमआरडीए’कडून वसई-विरार महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबत `एमएमआरडीए’ मुख्यालयात आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत आमदार राजन नाईक यांनी शहरातील विकासाचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली.
वसई-विरार परिसराचा `एमएमआरडीए’ क्षेत्रात १९८८ मध्ये समावेश करण्यात आला. मात्र, गेल्या अनेक वर्षांत वसई-विरारचा अपेक्षित विकास झालेला नाही, याकडे आमदार राजन नाईक यांनी लक्ष वेधले. यापुढील काळात नालासोपाऱ्यातील अलकापुरी व ओसवालनगरी येथील रेल्वे उड्डाणपूल, प्रशासकीय मान्यता मिळालेले विराटनगर व उमेळमान येथील दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या भूसंपादनाची कामे, अहमदाबाद महामार्गावरून पेल्हार ते नालासोपारा आणि विरार फाटा ते विरार शहरापर्यंत काँक्रीट रस्ता आदी कामे वेगाने करण्याची मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. या बैठकीला महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, भाजपच्या जिल्हाध्यक्षा व नगरसेविका प्रज्ञा पाटील, नगरसेवक गणेश पाटील यांच्यासह आयुक्त पृथ्वीराज बी. पी., एमएमआरडीए’चे अधीक्षक अभियंता चेतन बेंडाळे, कार्यकारी अभियंता सुरेंद्र शेवाळे, महापालिकेचे नगर अभियंता प्रदीप पाचंगे यांची उपस्थिती होती.

विकास आराखड्यातील सोपारा ते वसई सन सिटी गास आणि नारंगी उड्डाणपूल ते आगाशी रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची मागणी केली. या दोन्ही रस्त्यामुळे वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार असल्याकडे लक्ष वेधले. त्याचबरोबर उत्तन-विरार कोस्टल रोडला वसई कनेक्टर फेज – २ जोडण्याची मागणी केली. त्यावेळी याबाबत पाहणी करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आयुक्त मुखर्जी यांनी दिले.

—————-
चौकट
—————-
`बीकेसी’च्या धर्तीवर विकासासाठी
१५०० एकर जागा वर्ग करणार

आचोळे व दिवाणमान परिसरातील राज्य सरकारच्या मालकीची १५०० एकर मोकळी जमीन `बीकेसी’च्या धर्तीवर विकासासाठी कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. त्यावेळी संबंधित जमीन `एमएमआरडीए’कडे वर्ग करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांमार्फत कार्यवाही सुरू करण्यात येईल. त्यानंतर या भागाच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा केला जाईल, असे आश्वासन महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी दिले.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!