*पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्तेअखेर नारिंगी रेल्वे उड्डाणपूल खुला*


*आमदार राजन नाईक यांच्या प्रयत्नांना यश*
अनिरुद्ध मिश्रा /विरार, दि. ८ (प्रतिनिधी) : विरार शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या नारिंगी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. वसई-विरार शहराच्या विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असून, वेगवान प्रवासासाठी उड्डाणपूल व रस्त्यांच्या कामाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली. लोकार्पण झालेल्या नारिंगी उड्डाणपुलामुळे विरारमधील नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. या पुलासाठी भाजपचे आमदार राजन नाईक यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुलाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा, महापौर अजीव पाटील, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे, आमदार राजेंद्र गावित, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, नगरसेविका व भाजपा वसई विरार जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा पाटील, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे सार्वजनिक बांधकाम, वन विभाग व अन्य विभाचे अधिकारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. या पुलाला जवळपास ४० कोटी रुपये खर्च आला आहे.
नारिंगी येथील रेल्वे फाटकाच्या कामाला २०१९ मध्ये सुरूवात करण्यात आली. मात्र, भूसंपादनातील अडचणींमुळे अनेक वर्षांपासून काम रखडले होते. त्याचा संदर्भ घेत भाजपचे आमदार राजन नाईक यांनी आगामी काळात उड्डाणपूल व रस्त्याच्या कामाच्या भूसंपादनासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याची विनंती केली. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तत्काळ कामाला सुरूवात करावी, अशी आग्रही मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. नारिंगी उड्डाणपुलामुळे विरारकरांचा प्रवास वेगाने होईल. आता महापालिकेच्या विकास आराखड्यातील आगाशीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण केल्यास आगाशी, वटार आणि अर्नाळापर्यंतच्या नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी आमदार राजन नाईक यांनी केली. विरारहून वसईला जाण्यासाठी रिंगरूटचे काम करण्यासाठीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. वसई-विरारच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे महायुती सरकारच्या काळातच होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार उदार असून, वसई-विरारमधील महापालिका रुग्णालयासाठी २२ कोटी रुपयांची जागा मोफत मिळाली, याकडे आमदार राजन नाईक यांनी लक्ष वेधले. वसई-विरारच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून महत्त्वाची साथ लाभत आहे, याबद्दल आमदार नाईक यांनी आभार मानले.
दरम्यान, राजन नाईक यांनी आमदारपदावर निवडून आल्यानंतर सर्वप्रथम नारिंगी उड्डाणपुलाच्या कामाला प्राधान्य दिले होते. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबर समन्वय साधला होता. पुलाच्या पाहणीबरोबरच १५ जानेवारी २०२५ रोजी सर्व अधिकाऱ्यांची बैठक गेऊन पुलाच्या कामातील तांत्रिक अडथळे दूर केले. त्यानंतर पुलाच्या कामाला वेग आला. तसेच दर महिन्याला आढावा घेऊन काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले होते.राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेही पाठपुरावा केला होता.

