*आपली माहिती – विकास नियोजनाचा पाया”*
*पालघर जिल्ह्यात असंघटीत क्षेत्र आणि श्रमशक्ती सर्वेक्षण जनजागृती अभियानाचा शुभारंभ*
पालघर दि १८ जून २०२६ : भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत घेण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (PLFS) व असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASUSE) या महत्वपूर्ण राष्ट्रीय सर्वेक्षणांच्या जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड़ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड़ यांच्या हस्ते PLFS व ASUSE या सर्वेक्षणाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रके, पोस्टर्स व प्रचार साहित्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी राजू ढोकणे व सांख्यिकी अधिकारी (अ.का) भगवान पवार, व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी डॉ.इंदू राणी जाखड़ यांनी सांगितले की, PLFS (Periodic Labour Force Survey) या सर्वेक्षणाव्दारे कुटुंबातील सदस्यांची रोजगार स्थिती, बेरोजगारी, कामाचे स्वरुप, कामाचे तास, श्रमशक्ती सहभाग दर तसेच शिक्षण व वयोगटानुसार रोजगाराची स्थिती याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच ASUSE (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) या सर्वेक्षणाव्दारे असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म, लघु उद्योग, व्यापार, उत्पादन व विविध सेवा क्षेत्रातील आस्थापनांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या आकडेवारीच्या आाधारे असंघटित क्षेत्रातील उद्योगांची स्थिती, रोजगारनिर्मिती, उत्पादन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेतील योगदान यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासासाठी अचूक व विश्वासार्ह सांख्यिकीय माहिती अत्यंत आवश्यक आहे. रोजगार, बेरोजगारी, स्वयंरोजगार तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी PLFS व ASUSE ही सर्वेक्षणे महत्वाची भूमिका बजावतात. या सर्वेक्षणातून प्राप्त होणारी माहिती विकास कामांचे नियोजन, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि विविध लोककल्याणकारी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. सदर सर्वेक्षणाकरीता शासनाने नियूक्त केलेले अधिकृत अन्वेक्षक निवडक कुटुंबे व आस्थापनांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहे. सर्वेक्षणाव्दारे प्राप्त होणारी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून तिचा वापर केवळ शासकीय सांख्यिकीय उद्देशासाठीच केला जाणार आहे. “आपली माहिती – विकास नियोजनाचा पाया” या संदेशासह जिल्ह्यातील सर्व नागरिक, उद्योजक, व्यावसायिक आणि असंघटीत क्षेत्रातील घटकांनी सर्वेक्षणात सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी केले .

