खडकोना हद्दीत महामार्गावर आयसरला भीषण आग सुदैवाने जीवितहानी टळली वार्ताहर – अनिल साळुंखे


खडकोना हद्दीत महामार्गावर आयसरला भीषण आग

सुदैवाने जीवितहानी टळली

वार्ताहर – अनिल साळुंखे

 

मनोर,11/03/26
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खडकोना गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटे एका आयसर वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहन मोठ्या प्रमाणात जळून नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे ४:४५ वाजण्याच्या सुमारास एनएचआय पेट्रोलिंग व्हॅनच्या चालकाने फोनद्वारे ही माहिती मनोर वाहतूक पोलीस केंद्राला दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खडकोना गावाच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील तिसऱ्या लेनमध्ये उभ्या असलेल्या आयसर क्रमांक GJ-31-T-4894 या वाहनाला आग लागल्याचे निदर्शनास आले.

सदर वाहनाचा चालक आसिफ हुसेन (वय ४२, रा. मोडसा, जिल्हा अरवल्ली, गुजरात) असल्याची माहिती मिळाली आहे. आग लागल्यानंतर काही वेळातच एमआयडीसी बोईसर येथील अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेनंतर जळालेले वाहन रस्त्याच्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

महामार्गावर आगीच्या प्रमाणात वाढ

दरम्यान काही दिवसांपूर्वी याच परिसरात एका वाहनाला आग लागून त्यामध्ये एक व्यक्ती होरपळून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

विशेष म्हणजे खानिवडा ते चारोटी या दरम्यान दोन टोलनाके असतानाही या पट्ट्यात अग्निशामक दलाची स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. आग लागल्यानंतर पालघर, बोईसर किंवा डहाणू येथून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. तोपर्यंत आग लागलेली वाहने पूर्णपणे जळून खाक होतात. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!