गुहिर गावात ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ उपक्रमाची मुहूर्तमेढ सौरऊर्जेतून शाश्वत विकासाचा नवा मार्ग


गुहिर गावात ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ उपक्रमाची मुहूर्तमेढ

सौरऊर्जेतून शाश्वत विकासाचा नवा मार्ग

Oplus_16908288

वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर, दि. २८ एप्रिल २०२६
पालघर जिल्ह्यातील गुहिर गावाने शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ उपक्रमाची यशस्वी सुरुवात केली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. सचिन तेंडुलकर फाउंडेशन व स्प्रेडिंग हॅप्पीनेस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या प्रकल्पामुळे गावातील सुमारे १३० कुटुंबांना सौरऊर्जेवर आधारित वीज आणि पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रत्येक घरावर सोलर पॅनेल बसविण्यात आले असून घरगुती वापरासोबत शेतीसाठीही विजेची सोय करण्यात आली आहे. यासोबतच सौरऊर्जेवर चालणारी पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्यात आल्याने गावात नियमित आणि शाश्वत जलपुरवठा सुनिश्चित होणार आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने गावात सौरऊर्जेवर चालणारी पीठ गिरणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या दैनंदिन श्रमात मोठी बचत होऊन त्यांना उत्पन्नवाढीच्या संधीही निर्माण होणार आहेत.

उद्घाटन समारंभाला सचिन तेंडुलकर यांच्यासह त्यांची कन्या सारा तेंडुलकर आणि सानिया तेंडुलकर उपस्थित होत्या. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना सचिन तेंडुलकर यांनी या उपक्रमामुळे गावाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रात प्रथमच ‘क्लायमेट स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली असून, या मॉडेलमुळे ग्रामीण भागात पर्यावरणपूरक ऊर्जा, प्रभावी जलव्यवस्थापन आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, ऊर्जा व पाणी या मूलभूत गरजांची पूर्तता करत गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे गुहिर गाव राज्यातील आदर्श ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून ओळख निर्माण करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


14
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!