“जीवनाचा खरा अर्थ समजून विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेत समर्पित राहावे” – मा. श्री. गणेशजी नाईक
वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात श्री. भाऊसाहेब वर्तक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित IEEE तांत्रिक सहप्रायोजित आंतरराष्ट्रीय परिषद IC3ET 2026 (International Conference on Communication, Computing and Emerging Technologies) दिनांक ९ व १० फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीरीत्या पार पडली. या दोन दिवसीय परिषदेत संचार प्रणाली, संगणक तंत्रज्ञान तसेच उदयोन्मुख आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संशोधन विषयांवर आधारित तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. देश-विदेशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
परिषदेमध्ये इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग (IoE), कम्युनिकेशन अँड VLSI सिस्टिम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी अँड ब्लॉकचेन, इंडस्ट्रियल ऑटोमेशन तसेच इन्फ्रास्ट्रक्चर अँड सस्टेनेबिलिटी या प्रमुख ट्रॅक्स अंतर्गत संशोधन पेपर्सचे सादरीकरण झाले. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तसेच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. त्यांनी आपल्या भाषणात जीवनाचा अर्थ व उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेत समर्पित राहावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश हिमटे यांनी या दोन दिवसांचा उपयोग विद्यार्थ्यांनी शिकण्यासाठी करावा तसेच अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. परिषदेचे तांत्रिक कार्यक्रम अध्यक्ष डॉ. ठकसेन पर्वत यांनी IEEE च्या प्रवासाबद्दल माहिती देत IC3ET परिषदेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेला गौरव अधोरेखित केला. याप्रसंगी विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विकासजी वर्तक यांनी अशा परिषदांचे समाजाला होणारे फायदे स्पष्ट करत संशोधनामुळे नवकल्पना निर्माण होतात, नवीन कल्पनांचा प्रसार होतो तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांपलीकडील ज्ञान मिळते, असे नमूद केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा सल्ला दिला. ऑस्ट्रेलियातील शिक्षणतज्ज्ञ व मुख्य वक्ते डॉ. कार्लोस मचाडो यांनी परिषदेमध्ये केवळ ज्ञान मांडण्यासाठीच नव्हे तर इतरांचे अनुभव ऐकून अधिक ज्ञान आत्मसात करण्यासाठी उपस्थित राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या परिषदेत अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, क्यूबा तसेच दक्षिण कोरिया यांसारख्या विविध देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतल्यामुळे परिषदेचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक अधोरेखित झाला.
IC3ET 2026 ही परिषद संशोधन व नवकल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी एक प्रभावी मंच ठरली. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची व भविष्यातील संशोधनासाठी प्रेरणा मिळण्याची संधी प्राप्त झाली.
परिषदेचा समारोप डॉ. सुनयना जाधव आणि डॉ. तत्त्वदर्शी नागरहळ्ळी यांनी दिलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यांनी सर्व मान्यवर पाहुणे, वक्ते, सहभागी संशोधक व आयोजकांचे योगदानाबद्दल आभार मानले.

