ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा जल्लोष; मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते उद्घाटन
Oplus_16908288Oplus_16908288
पालघर दि १८:-उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पालघर मिनी सरस 2026” या महिला स्वयंसहायता समूहांच्या भव्य विक्री व प्रदर्शन मेळाव्याचा आज शिरगाव बीच, पालघर येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम ग्लोबल कोकण महोत्सवासोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात आला असून 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान दररोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत मेळावा नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) इजाज अहमद, पंचायत विभागाचे अशोक पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
या प्रदर्शनात पालघर जिल्ह्यातील 73, रत्नागिरी 12, ठाणे 7, रायगड 5, पुणे 2 तसेच नाशिक, जळगाव व कोल्हापूर येथील प्रत्येकी 1 अशा एकूण 102 स्वयंसहायता समूहांचा सहभाग असून सुमारे 80 स्टॉल हस्तकला व अन्य उत्पादनांचे तर 20 स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे आहेत.
मेळाव्यात कोकणातील पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक खाद्यपदार्थांपर्यंत वैविध्य अनुभवायला मिळत आहे. रस शिरवाळे, पातोळ्या, केळवे येथील प्रसिद्ध बेक्ड योगर्ट, घरगुती मसाले, लोणची, पापड, सोलकढी, कोकम सरबत, मिलेट्सपासून तयार पदार्थ, विविध शाकाहारी व मांसाहारी जेवण यांना विशेष मागणी आहे. तसेच खादीच्या पिशव्या, कापडी व ज्यूट बॅग, कोल्हापुरी चपला,वारली पेंटिंग, बांबू व लाकडी कलाकुसर, आदिवासी दागिने, हातमागावरील वस्त्रे, जव्हार येथील निर्गुडीचे तेल, आयुर्वेदिक उत्पादने, नैसर्गिक साबण, अगरबत्ती, मेणबत्त्या, सजावटीच्या वस्तू आदी उत्पादनांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत आगामी अर्थसंकल्प सादरीकरणाच्या पार्श्वभूमीवर फोल्डर म्हणून वापरण्यासाठी 100 कापडी पिशव्यांची ऑर्डर स्वयंसहायता समूहांना देण्यात आली, यामुळे महिलांना थेट व्यवसाय संधी उपलब्ध झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही वैयक्तिकरित्या पिशव्या खरेदी करून महिलांना प्रोत्साहन दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आपल्या प्रतिपादनात म्हणाले,
“पालघर मिनी सरस आणि ग्लोबल कोकण महोत्सव हे दोन्ही कार्यक्रम एकत्र आल्यामुळे त्यांना परस्परांची जोड मिळाली आहे. त्यामुळे दोन्ही उपक्रमांना एकमेकांचा निश्चितच फायदा होणार आहे. पुढील पाच दिवस मोठ्या प्रमाणात पर्यटक या मेळाव्याचा आनंद घेतील आणि स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होईल, असा विश्वास आहे. या माध्यमातून ग्रामीण महिलांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट होईल.”
मागील दोन वर्षांतील प्रदर्शनांमध्ये 15 ते 20 लाख रुपयांची विक्री झाली असून हजारो नागरिकांनी भेट दिली होती. यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विक्री व ग्राहकसंख्या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव ठरणाऱ्या या मेळाव्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.