पालघरात ‘गोवर्धन स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट्स इश्वाद’चे उद्घाटन उत्साहात

मनोर, प्रतिनिधी अनिल साळुंखे
भारतीय सात्त्विक अन्नसंस्कृती, सेंद्रिय शेती आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित पाककलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या ‘गोवर्धन स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट्स इश्वाद या नव्या शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन गोवर्धन इकोव्हिलेज गालतरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमास सिम्बायोसिस स्कूल ऑफ कुलिनरी आर्ट्स अँड न्यूट्रिशनल सायन्सेस, पुणे यांचे शैक्षणिक सहकार्य लाभले आहे. उद्घाटनानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी परम पूज्य एच.एच. राधानाथ स्वामीजी, श्री गौरांग दास प्रभुजी, उद्योजक श्री डॅनी वाधवानी तसेच सौ. इशिता दे वाधवानी हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला विशेष आध्यात्मिक व शैक्षणिक अधोरेखा लाभली.
पत्रकार परिषदेत बोलताना मान्यवरांनी भगवद्गीतेतील ‘पत्रं, पुष्पं, फलं, तोयं’ या तत्त्वाचा उल्लेख करून अन्न हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ते समर्पण, शुद्धता आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. इस्कॉन परंपरेत मंदिरांमार्फत भगवानाला नैवेद्य अर्पण करून प्रसादरूपाने अन्नवितरण करण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. १९७० च्या दशकात ‘गोविंदा’ रेस्टॉरंट्सच्या माध्यमातून सात्त्विक भोजनाची संकल्पना व्यापक स्तरावर राबविण्यात आली असेही नमूद करण्यात आले.
नव्या संस्थेमध्ये नऊ महिन्यांचा सात्त्विक पाककला पदविका अभ्यासक्रम तसेच सहा महिन्यांचा बेकरी व पेस्ट्री कौशल्यविकास अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सहा महिने संस्थेत प्रशिक्षण आणि तीन महिने औद्योगिक प्रशिक्षण अशी अभ्यासरचना असेल. अन्नघटकांची शुद्धता, स्वच्छता, तापमाननियंत्रण, वैज्ञानिक पद्धती तसेच कांदा-लसूणविरहित सात्त्विक पाककलेवर विशेष भर दिला जाणार आहे.
वनस्पती आधारित आहारामुळे पर्यावरणसंवर्धन, जलसंपत्तीची बचत आणि आरोग्यसंवर्धन साध्य होते. असे प्रतिपादन करत भारतीय अन्नपरंपरेचे दस्तावलीकरण करून नव्या पिढीला कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या संस्थेचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

