मनोर परिसरातील बंगल्यावर मध्यरात्री चोरीसीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांचा मनोर पोलिसांकडून शोध सुरू

वार्ताहर – अनिल साळुंखे
मनोर, ता. 18/05/26
पालघर तालुक्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनोर शहरातील नई बस्ती परिसरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी एका बंगल्यात प्रवेश करून सुमारे पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे मनोर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नई बस्ती परिसरातील आलाना शाळेजवळ राहणारे नूरेन पटेल यांच्या बंगल्यावर रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास तीन अज्ञात चोरटे आले होते. चोरट्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते. घरात प्रवेश करण्यासाठी त्यांनी विशेष तयारी केली असल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे.
चोरट्यांकडे पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी स्टीलची शिडी होती. त्या शिडीच्या साह्याने त्यांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये प्रवेश केला. मात्र हॉलमध्ये मौल्यवान वस्तू अथवा रोख रक्कम न सापडल्याने त्यांनी खालील मजल्यावरील ऑफिसकडे मोर्चा वळवला. ऑफिसमध्ये ठेवलेली सुमारे पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे काही क्षणात पसार झाले.
चोरीची संपूर्ण घटना बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीनही चोरटे तोंड झाकून शिडीच्या सहाय्याने घरात प्रवेश करताना दिसत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मनोर पोलीस संशयितांचा शोध घेत असून परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. चोरट्यांनी चोरीपूर्वी परिसराची रेकी केली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
- घटना मध्यरात्री घडल्याने परिसरातील नागरिकांना याची माहिती सकाळी मिळाली. चोरीची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मनोर पोलीस करीत आहेत.

