*मोखाडा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन*
*नागरिकांच्या प्रश्नांना मिळणार तात्काळ तोडगा*
पालघर दि ६ मार्च : सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या महसूल विभागाशी संबंधित विविध समस्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाकडून “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा क्र. १” राबविण्यात येत आहे. मार्च ते मे या कालावधीत राज्यभर महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगर पंचायत पातळीवर हे विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती, डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर, तसेच नागरिकांना Single Day Service द्वारे विविध सेवा एका दिवसात उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
मोखाडा तालुक्यात या अभियानांतर्गत दोन ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. मोखाडा मंडळाचे शिबीर ७ मार्च २०२६ रोजी साई मंदिर, मोखाडा येथे, तर खोडाळा मंडळाचे शिबीर १४ मार्च २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, खोडाळा येथे पार पडणार आहे.
या शिबिरांमध्ये महसूल विभागासह महिला व बालविकास, आरोग्य, सहकारी संस्था, राज्य परिवहन महामंडळ, नगर पंचायत, कृषी, पशुसंवर्धन, दुय्यम निबंधक कार्यालय, वन विभाग, महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ, पंचायत समिती, अन्न व नागरी पुरवठा विभाग, संजय गांधी योजना , भूसंपादन शाखा आणि मनरेगा विभाग अशा विविध विभागांचा सहभाग राहणार आहे.
शिबिरात प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ व ८अ दुरुस्ती, जिवंत सातबारा मोहिम, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, भूसंपादन, अकृषिक परवानगी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पट्टे वाटप, विद्यार्थी दाखले वितरण आदी कामांवर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
तसेच डिजिटल ७/१२ महाभूमी पोर्टल, ई-फेरफार, ई-मोजणी प्रणाली, ई-रेशन कार्ड, ई-केवायसी व डीबीटी अर्ज स्वीकृती यांसारख्या ऑनलाईन सेवांची सुविधा देखील नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.
याशिवाय कृषी यंत्रीकरण लाभ, शेतकरी अपघात विमा, घरकुल व आवास योजना, सोलार पॅनल योजना याबाबत माहिती व मार्गदर्शन नागरिकांना देण्यात येणार आहे.
या शिबिरांमुळे तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार असल्याने संबंधित गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोखाडा तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.

