वनक्षेत्रात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


पालघर, दि. 21 जून : प्रादेशिक वन विभाग, डहाणू अंतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पालघर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वन अधिकारी, वन कर्मचारी तसेच नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.योग ही भारताची प्राचीन परंपरा असून शरीर, मन आणि आत्म्याला एकत्रित करणारी जीवनशैली मानली जाते. वनपरिक्षेत्राधिकारी सुशील नांदवटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले आणि योग दिनाचे महत्त्व सांगितले की ,योगाचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन भारताने संयुक्त राष्ट्र महासभेसमोर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास 177 देशांचा पाठिंबा मिळाल्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर 21 जून 2015 रोजी जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या 21 जूनला विशेष महत्त्व असल्याने हा दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला.कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा सराव करण्यात आला. योगामुळे शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे यावेळी सांगण्यात आले.शरीर स्वस्थ, मन उत्साही आणि जीवन स्वावलंबी संतुलित करण्यासाठी रोज योग आवश्यक आहे.
याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक पालघर श्री. सुशील नांदवटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, योग ही केवळ शारीरिक हालचालींची पद्धत नसून शरीर, मन आणि विचार यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनशैली आहे. भारताच्या ऋषी-मुनींनी जगाला दिलेली ही अनमोल परंपरा आज संपूर्ण जग स्वीकारत आहे. दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार केल्यास आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगणे शक्य होते.
ते पुढे म्हणाले की, जीवनातील प्रत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने, जबाबदाऱ्या आणि बदल येत असतात. या बदलांशी जुळवून घेत मानसिक स्थैर्य राखण्याची शक्ती योगातून प्राप्त होते. भगवद्गीतेत वर्णन केलेले “समत्वं योग उच्यते” हे तत्त्व आजच्या धावपळीच्या जीवनात अधिक महत्त्वाचे ठरते. सुख-दुःख, यश-अपयश किंवा अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत मनाचा समतोल राखणे हीच योगाची खरी शिकवण आहे.यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना “Yoga for Healthy Ageing” (निरोगी वार्धक्यासाठी योग) अशी असून, वाढत्या वयात आरोग्य, कार्यक्षमता आणि स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. निरोगी वार्धक्य ही अचानक मिळणारी गोष्ट नसून तरुणपणापासून अंगीकारलेल्या सवयींचा परिणाम असतो. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्य जपण्यासाठी योगाचा आधार घेणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी व्यक्ती विविध योजनांमध्ये गुंतवणूक करते, त्याचप्रमाणे आरोग्यात केलेली गुंतवणूकही तितकीच आवश्यक आहे. नियमित योगाभ्यास, प्राणायाम, योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांच्या माध्यमातून भविष्यात उद्भवू शकणाऱ्या अनेक शारीरिक व मानसिक समस्यांपासून संरक्षण मिळू शकते. आरोग्य हीच खरी संपत्ती असून तिचे संवर्धन करण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.मानवी शरीर सतत परिवर्तनशील आहे. शरीरातील लाखो पेशी प्रत्येक क्षणी निर्माण होतात, कार्य करतात आणि कालांतराने नष्ट होतात. वाढत्या वयानुसार या प्रक्रियांमध्ये बदल होऊ लागतो. स्नायूंची ताकद घटणे, हाडांची झीज वाढणे, शरीराची लवचिकता कमी होणे आणि अवयवांची कार्यक्षमता मंदावणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी योग्य जीवनशैलीद्वारे तिचा वेग कमी करता येतो. यामध्ये योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत तणाव, अपुरी झोप, अनियमित आहार, व्यसनाधीनता आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही चिंतेची बाब बनली आहे. अशा सवयींमुळे शरीराचे जैविक वय वाढण्याचा वेग अधिक होतो. अनेक वेळा व्यक्तीचे कालगणनेनुसार असलेले वय आणि शरीराची प्रत्यक्ष कार्यक्षमता यामध्ये मोठी तफावत दिसून येते. योग या अंतराला कमी करून शरीर व मन अधिक सक्षम बनविण्यास मदत करतो.
योग म्हणजे फक्त काही आसनांचा सराव नव्हे. तो एक संपूर्ण जीवनदृष्टिकोन आहे. योगशास्त्रातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या सर्व अंगांचा समन्वय साधल्यास व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो. त्यामुळे योगाचा विचार केवळ व्यायाम म्हणून न करता जीवनपद्धती म्हणून करणे आवश्यक आहे.
योगासनांच्या नियमित सरावामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायूंना बळकटी मिळते आणि शरीराचा तोल राखण्याची क्षमता सुधारते. प्राणायामामुळे श्वसनक्रिया अधिक परिणामकारक होते तसेच फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. ध्यानसाधनेमुळे मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मकता विकसित होते. त्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते.
वैज्ञानिक संशोधनांमधूनही योगाचे अनेक फायदे सिद्ध झाले आहेत. नियमित योगाभ्यासामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा, सांध्यांचे विकार आणि तणावजन्य समस्यांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवून जीवनाचा दर्जा उंचावण्यास योग उपयुक्त ठरतो.
योग ही कोणत्याही विशिष्ट वयोगटापुरती मर्यादित संकल्पना नाही. बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमतेनुसार योगाचा लाभ घेऊ शकते. निरोगी, सक्रिय, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण जीवनासाठी योग हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि परिणामकारक मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. सोहम राज (BPT), फिजिओथेरपिस्ट, लुधियाना यांनी प्राणायामाचे महत्त्व विशद करून उपस्थित सर्व नागरिकांकडून प्राणायाम व ध्यानसाधनेचा सराव करून घेतला. श्वसनसंस्था सुदृढ ठेवण्यासाठी तसेच फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध योगासनांचे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. याशिवाय मान, हात, पाय व कमरेशी संबंधित विविध शारीरिक विकारांवर परिणामकारक ठरणाऱ्या आसनांची माहिती देऊन त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित योगाभ्यासकांकडूनही विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील नांदवटे यांनी दिली.
तसेच डॉ. राजू खान, योग मार्गदर्शक, पालघर यांनी संतुलित आहार, योग्य विहार आणि नियमित योगाभ्यास यांचे महत्त्व अधोरेखित केले. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास अनेक शारीरिक व मानसिक समस्यांवर प्रभावीपणे मात करता येते, असे त्यांनी सांगितले. वनक्षेत्रात कर्तव्य बजावताना वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीचा किंवा आरोपींचा एकट्याने सामना करावा लागतो. अशा वेळी स्वतःचे संरक्षण करत संबंधित व्यक्तीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या Self-Defence Techniques चे प्रात्यक्षिक त्यांनी सादर केले. उपस्थितांना विविध आत्मसंरक्षण तंत्रांची माहिती देत त्यांचा प्रत्यक्ष सरावही करून घेण्यात आला.यावेळी श्रीमती उमंग राज योगा मार्गदर्शक, पालघर यांनी तरुणीना आणि महिला वनाधिकाऱ्याला defence technics प्रात्यक्षिक करून घेतले तसेच विविध लाठी काठी चे प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने वनकर्मचारी व वनअधिकारी श्री.सुशील विसपुते , श्री प्रमोद सुतार,श्री सुनील घुटे, श्रीमती वृषाली वरठा, श्रीमती सोनाली झुगरे, श्रीमती नम्रता प्रमोद घेगड,भरत धरमले, प्रदीप कांवडी, निखिल हमरे,कांबळे , रावते,सचिन राठोड सर्प इंडिया तसेच तरुण तरुणी नागरिक यांनी योगाभ्यास व आसने यावेळी केली. तसेच कार्यक्रमाला उपवनसंरक्षक डहाणू श्री निरंजन दिवाकर आणि सहा वनसंरक्षक श्री रामानुज बांगर यांनी मार्गदर्शन लाभले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. सुशिल नांदवटे वनपरिक्षेत्र अधिकारी पालघर यांनी केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी,
प्रादेशिक पालघर
“निसर्गाशी सुसंवाद आणि शरीराशी संवाद साधण्याची कला म्हणजे योग. वनसंवर्धनाप्रमाणेच आरोग्य संवर्धनासाठीही सातत्य, शिस्त आणि समर्पण आवश्यक असते. योग या तिन्ही गोष्टींची जाणीव करून देतो.योग केवळ व्यायाम नसून आयुष्यभर निरोगी राहण्याची जीवनशैली असून
योग ही निरोगी वार्धक्याची गुरुकिल्ली आहे.
“— सुशील नांदवटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक पालघर

