महिला दिन विशेष
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी झटणाऱ्या शिक्षिका — सौ. सुवर्णा वडगणे (देशमुख)
वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,
मनोर परिसरातील टाकवहाळ गावातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. सुवर्णा राजेंद्र वडगणे (देशमुख) या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या समर्पित शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विश्वासातून त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम मनापासून करत आहेत.
सन २०१९ पासून त्या मनोर-मस्ताननाका येथील टाकवहाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना त्या केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण झाली असून शाळेच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे.
या कार्यात त्यांना अंगणवाडी सेविका सुरेखा रावते, मुख्याध्यापिका सोनाली शेळके तसेच आशा वर्कर संध्या गणेशकर यांचे सहकार्य लाभत आहे. “आपण समाजाला जे देतो तेच आपल्याकडे परत येते” या विचारावर विश्वास ठेवत त्या गावातील नागरिक, शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपतात.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी साध्या कुटुंबातून येत असल्याने त्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होत नाही. हे लक्षात घेऊन सुवर्णा वडगणे विविध संस्था आणि समाजातील दात्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय शूज, दप्तर, वह्या आणि इतर साहित्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्या सातत्याने मार्गदर्शन करत असतात.
त्यांच्या कार्याचे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे टाकवहाळ गावातील स्वर्गीय बाबल्या पाडेकर यांचा मुलगा आयुष पाडेकर. सहा वर्षांचा आयुष हा थोडा गतिमंद असल्यामुळे शाळेत आल्यावर तो वारंवार रडत असे आणि आईशिवाय राहू शकत नव्हता. मात्र सुवर्णा मॅडम यांनी प्रेम, संयम आणि योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आज आयुष आनंदाने शाळेत येतो आणि स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करतो.
आपल्या मुलामध्ये झालेला हा सकारात्मक बदल पाहून आयुषच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसतात आणि त्या संपूर्ण श्रेय सुवर्णा मॅडम यांच्या मेहनतीला देतात.
एक आई, पत्नी आणि शिक्षिका म्हणून कुटुंब व समाजाची जबाबदारी सांभाळत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य त्या करत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाला नवी उभारी देणाऱ्या अशा समर्पित शिक्षिकेचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम.

