कोळगाव ग्राम सचिवालयाचे लोकार्पण उत्साहात


 

  • कोळगाव ग्राम सचिवालयाचे लोकार्पण उत्साहात

पालघर दि ५- कोळगाव ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालयाचे लोकार्पण आज खासदार (पालघर लोकसभा) डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, शिवसेना उपनेते ज्योतीताई मेहेर, नगरसेवक शेखर वडे व अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास सरपंच कुणाल चंद्रकांत पाटील, उपसरपंच किरण संकेत, तंटामुक्ती अध्यक्ष महोतुल पाटील, विविध गावांचे सरपंच—प्रभाकर पाटील (उमरोळी), शिल्पा मस्कर (आंद्रेभुरे), समीर मोरे (नांदगाव), प्रगती पाटील (पोचडे) तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकार्पण सोहळ्यानिमित्त कोळगाव ग्रामपंचायतीमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र तपासणी, वजन, रक्तगट व इतर तपासण्या करण्यात आल्या. तसेच सुमारे ४०० महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून साड्यांचे वाटप करण्यात आले. कांदळवन समितीअंतर्गत २७ महिला बचत गटांना विविध साहित्य वितरित करण्यात आले.

सरपंच कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम म्हणून त्यांनी नेत्रदानाची नोंदणी केली, ही उल्लेखनीय बाब ठरली. आपल्या भाषणात सरपंच पाटील यांनी ग्राम सचिवालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते इमारत पूर्णत्वास नेण्यापर्यंत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच ग्राम सचिवालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व्हावा यासाठी त्या ठिकाणी शिलाफलक उभारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी कोळगावसाठी प्रवेशद्वार (कमान) उभारून देण्याची घोषणा केली, तर खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी ग्राम सचिवालयासमोरील रस्ता तसेच पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पुलासाठी सकारात्मक भूमिका दर्शवून मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सरपंच कुणाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत, कमी कालावधीत लोकसहभागातून उभारलेले हे ग्राम सचिवालय इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

ग्राम सचिवालय उभारणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी गोविंद बोडके, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तहसीलदार रमेश शेंडगे, तलाठी संजय चुरी, सर्कल अधिकारी अनिल वायाळ, मेहुल पाटील, कुंदन संख्ये तसेच विनोद पाटील, माजी गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कोळगाव ग्राम सचिवालयाच्या लोकार्पणामुळे ग्रामस्थांना प्रशासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!