मनोर वाडा भिवंडी महामार्गाची खासदार डॉ. हेमंत सवरा यांची पाहणी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना वार्ताहर – अनिल साळुंखे


मनोर वाडा भिवंडी महामार्गाची खासदार डॉ. हेमंत सवरा यांची पाहणी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

वार्ताहर – अनिल साळुंखे

मनोर,04/05/26
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली मनोर–वाडा तसेच वाडा–भिवंडी महामार्गाचा पाहणी दौरा आज आयोजित करण्यात आला. दौऱ्याची सुरुवात कंचाड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीने झाली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच ईगल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणी, वाढती अपघातांची संख्या तसेच अपूर्ण राहिलेल्या कामांबाबत खासदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

यानंतर खासदारांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनीही आपल्या अडचणी मांडल्या. नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्या तातडीने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाली येथील पुलाचीही पाहणी करण्यात आली.

पावसाळा जवळ येत असल्याने रस्त्यांच्या पूर्वतयारीवर विशेष भर देण्यात आला. मनोर ते वाडा हा सुमारे २३ किलोमीटरचा रस्ता असून त्यापैकी सुमारे १२ ते १३ किलोमीटरपर्यंत एक लेन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवणे, अपघातप्रवण ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती करणे आणि दर्जेदार काम सुनिश्चित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

याशिवाय पावसाळ्यातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन, जेसीबी यंत्रणा, खडीचा साठा आणि इतर आवश्यक सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
“मे अखेरपर्यंत सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्ण होईल. नागरिकांनी वाहन चालविताना विशेषतः ब्लॅक स्पॉट भागात अधिक काळजी घ्यावी,” असे आवाहन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केले.

या पाहणी दौऱ्यावेळी खासदारांसमवेत कार्यकर्ते, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


13
कृपया वोट करा

आजचे प्रवचनकारच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!