जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर येथे “वन कायदे व पर्यावरण” विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

पालघर दि ५:-
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर येथे “वन कायदे व पर्यावरण” या विषयावरील बहुपर्यायी लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा, पर्यावरण जनजागृती व्याख्यान आणि विद्यार्थी संवाद कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाबाबत युवक, विद्यार्थी आणि नागरिकामध्ये जागरूकता निर्माण करणे, वन कायद्यांविषयी माहिती देणे तसेच वाढत्या पर्यावरणीय समस्यांबाबत समाजात जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
जागतिक पर्यावरण दिन निमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पालघर यांच्याकडून आयोजित वन कायदे व पर्यावरण या विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन आणि प्रस्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी पालघार सुशील नांदवटे यांनी केले तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व पटवून देताना पर्यावरण हा केवळ अभ्यासाचा विषय नसून प्रत्येकाच्या अस्तित्वाशी निगडित घटक असल्याचे सांगण्यात आले. शुद्ध हवा, पाणी, अन्न, आरोग्य आणि सुरक्षित जीवन यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे जागतिक अहवालानुसार पर्यावरणाचे सतत नुकसान होत राहिल्यास जागतिक तापमान वाढ दोन अंश सेल्सिअसने वाढवून समुद्राची पातळी एक मीटरने वाढणार असून समुद्र किनाऱ्यावरील शहरे पाण्याखाली जाण्याचा शक्यता आहे.
पुढे मार्गदर्शनात जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि त्याचे मानवजातीवर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून देशभरात वाढत असलेले तापमान, उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ, चक्रीवादळे आणि पाणीटंचाई यामागे पर्यावरणीय असंतुलन हे महत्त्वाचे कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, ठाणे, पालघर यांसारख्या शहरांमध्ये वाढत्या तापमानाची नोंद होत असून अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे नमूद करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) सन १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे आयोजित केलेल्या परिषदेनंतर पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर दरवर्षी ५ जून हा दिवस “जागतिक पर्यावरण दिन” म्हणून साजरा केला जात असल्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात वाढत्या कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत असल्याचे सांगण्यात आले. औद्योगिकीकरणापूर्वी वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सुमारे १८५ PPM होते, तर सध्या ते ४२० PPM च्या पुढे गेले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यामुळे हिमनद्या वेगाने वितळत असून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. भविष्यात किनारपट्टीवरील अनेक भागांना याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
भारतीय संविधानातील पर्यावरण संरक्षणाशी संबंधित तरतुदींची माहिती देताना संविधानाच्या कलम ५१(अ)(ग) नुसार प्रत्येक नागरिकाचे पर्यावरण, वनसंपदा, सरोवरे, नद्या आणि वन्यजीवांचे संरक्षण करणे हे मूलभूत कर्तव्य असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
वनविभाग नेहमी निसर्ग संवर्धन आणि संरक्षण याबाबत जनजागृती व विविध स्पर्धेचे यापुढे देखील आयोजन करेल तसेच यावर्षी एक कोटी वृक्ष लागवड पालघर जिल्ह्यात करावयाची असल्याने नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने वृक्ष लागवड करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.
यानंतर “वन कायदे व पर्यावरण” या विषयावरील बहुपर्यायी लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांच्या वन कायदे, जैवविविधता, वन्यजीव संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल याविषयीच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पर्यावरण मित्र प्रा. श्री. सुधीर भांडवलकर यांनी पर्यावरण बदल, हवामान संकट आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन केले. गेल्या पंधरा वर्षांपासून पर्यावरण जनजागृती क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. भांडवलकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उदाहरणांच्या माध्यमातून प्रभावी संवाद साधला. वाढते प्रदूषण, जंगलतोड, जलस्रोतांचे होणारे नुकसान आणि जैवविविधतेवरील संकट यांचा भविष्यातील पिढ्यांवर होणारा परिणाम त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
यावेळी त्यांनी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. केवळ वृक्षारोपण करून न थांबता त्यांचे संगोपन व संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच प्लास्टिकमुक्त जीवनशैली, जलसंधारण, ऊर्जा बचत, जैवविविधतेचे संरक्षण आणि स्थानिक पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन हरित महाराष्ट्र आणि हरित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या अभंगातील विचारांचा संदर्भ देत त्यांनी वृक्ष हे केवळ नैसर्गिक साधन नसून मानवाचे खरे सगे-सोयरे असल्याचे सांगितले. वृक्षांचे जतन म्हणजे भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण असल्याचे त्यांनी नमूद केले. संत तुकाराम महाराजांनी निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा दिलेला संदेश आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण पर्यावरणविषयक धोरणांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, स्वराज्य निर्मितीच्या काळात महाराजांनी किल्ले, जंगल आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला होता. रयतेच्या उपयोगासाठी असलेल्या फळझाडांची विनाकारण तोड होऊ नये तसेच जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी त्यांनी कठोर आदेश दिले होते. शिवाजी महाराजांचा निसर्ग संवर्धनाचा हा आदर्श आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत नवचेतना निर्माण करून भविष्यात शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी युवकांनी सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे सांगत, प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन श्री. भांडवलकर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक वर्ग, सर्प इंडिया संस्था मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त करण्यात आली तसेच भविष्यातही वनविभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम, स्पर्धा, वृक्षारोपण मोहिमा आणि वन कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पालघर आणि वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अतोनात प्रयत्न करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर वनपरिक्षेत्र कार्यालय, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच वन कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून मोरे कुरण येथील संरक्षित वन क्षेत्रातील मोकळ्या जागेत सुमारे ६,००० बीज गोळ्यांचे (Seed Balls) फेकून वृक्ष लागवड करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नैसर्गिक पद्धतीने वृक्षारोपणाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीज गोळे पावसाळ्यात उगवून त्यापैकी सुमारे ७५ ते ८० टक्के बीजांचे वृक्षांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असल्याने हा उपक्रम वनसंवर्धनासाठी प्रभावी ठरणार आहे.
याच अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक पालघर श्री. सुशील गंगाधर नांदवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत सुमारे १ लाख बीज गोळ्यांची निर्मिती करण्यात आली असून लोकसहभागातून विविध वनक्षेत्रांमध्ये बीज गोळ्यांचे प्रक्षेपण करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कमी खर्चात, स्थानिक प्रजातींच्या संवर्धनाला चालना देत अधिकाधिक क्षेत्र हरित करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थांनी या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.
सदर दोन्ही कार्यक्रमास डहाणू वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. निरंजन दिवाकर, सहाय्यक वनसंरक्षक श्री. रामानुजी बांगर यांनी मार्गदर्शन केले आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे अध्यक्ष, उपप्राचार्य पोळ प्रा. संतोष चुरी, प्रा. बरडे मॅडम, वनअधिकारी प्रदीप सुतार, राजू पिंपळे, सुनील घुटे, भरत पवार,भारती चव्हाण, निकिता गवळी, वृषाली वरठा, सोनाली झूगरे, प्रदीप कांबडी , धन्वंतरी भोये, प्रमोद घेगड, धरमले, कांबळे,सर्प इंडिया संस्थेचे सदस्य सचिन राठोड अक्षय मांडल,रोहित पडीयाळ,जय धोडी,राहुल भुतकडे,अरविंद खरपडे,रोहित दांडेकर ,नितेश वारथा,
श्री. सचिन राठोड तसेच आणि महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
“पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वाढते तापमान, बदलते हवामान आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा पर्यावरण रक्षक आहे. त्यामुळे युवकांनी पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा. आपण लावलेला प्रत्येक वृक्ष हा भावी पिढ्यांसाठी दिलेला अमूल्य वारसा आहे. हरित पालघर आणि हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे.”
सुशील गंगाधर नांदवटे
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक पालघर
–”या पर्यावरण दिनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवड हा कार्यक्रम नसून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य निर्माण करण्याचा संकल्प आहे. पर्यावरण वाचविणे म्हणजेच मानवजातीचे भविष्य वाचविणे होय.”
प्रा.सुधीर भांडवलकर

